खेड्यांचा विकास म्हणजे देशाचा विकास : श्वेता शालिनी; सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहातर्फे गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 01:07 PM2018-01-16T13:07:37+5:302018-01-16T13:13:39+5:30
सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाच्या तिसऱ्या वर्धापन दिनासह विवेकानंद जयंती, राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून जीवनगौरव, विवेकानंद युवारत्न व जिजाऊ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन पत्रकार भवन येथील सभागृहात करण्यात आले होते.
पुणे : समाजातील गरजू लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन कार्य करण्याची गरज आहे. सामाजिक संस्थांनी खेड्यांचा विकास करण्याच्या कार्यात हातभार लावणे गरजेचे आहे. खेड्यांमध्ये काम केल्यास स्वत:बरोबरच त्या गावाचा आणि पर्यायाने देशाचा विकास होईल, असे मत मुख्यमंत्र्यांच्या सल्लागार श्वेता शालिनी यांनी व्यक्त केले.
सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाच्या तिसऱ्या वर्धापन दिनासह विवेकानंद जयंती, राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून जीवनगौरव, विवेकानंद युवारत्न व जिजाऊ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन पत्रकार भवन येथील सभागृहात करण्यात आले होते. या वेळी भाजपा पुणे शहराध्यक्ष योगेश गोगावले, टि. म. वि.च्या समाजकार्य विभागाचे डॉ. प्रकाश यादव, सी.एस.आर. सदस्य प्रदीप तुपे, ससूनचे समाजकार्य अधीक्षक सत्यवान सुरवसे, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मुख्य संयोजक शेखर मुंदडा, सोशल सिस्पॉन्सिबिलिटीचे अध्यक्ष विजय वरुडकर उपस्थित होते.
श्वेता शालिनी म्हणाल्या, ‘‘भारतातील ५० टक्के जी. डी. पी. खेड्यांमधून येतो. खेड्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे; परंतु तेथील लोकांचे सबलीकरण होण्यासाठी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी एकत्र येण्याची गरज आहे.’’
योगेश गोगावले म्हणाले, ‘‘परिस्थिती, काळ, विषय बदलले तसे सामाजिक जीवनातील समस्यांमध्येदेखील बदल झाले आहेत. बदलत्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतील; परंतु आपण एकत्र येऊन काम करून देश विकसित करू या. भविष्यकाळात समृद्ध जीवनाबरोबर खिलाडू वृत्तीने समाजासाठी कार्य करणाऱ्यांची गरज आहे.’’
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला. वनराईचे मुकुंद शिंदे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राहुल पाटील, गणेश बाकले, वैभव मोगरेकर, प्रशांत खांडे, सूरज पोळ, रत्नाकर कोष्टी, अमोल उंबरजे, विजय दरेकर, संदीप फुके, राज देशमुख, शशी काटे यांना युवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रीती काळे, डॉ. मनीषा दानाने, वसुधा देशपांडे यांना जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.