विकासकामे वेळेत पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:08 AM2021-07-12T04:08:02+5:302021-07-12T04:08:02+5:30
एकात्मिक विकास समन्वय व पुर्नविलोकन समितीची पहिली बैठक बारामती: तालुक्यासह शहरात विविध विकासकामे चालू आहेत. सर्व विभाग ती ...
एकात्मिक विकास समन्वय व
पुर्नविलोकन समितीची पहिली बैठक
बारामती: तालुक्यासह शहरात विविध विकासकामे चालू आहेत. सर्व विभाग ती जबाबदारीने पार पाडत आहेत, ही पण एक समाधानाची बाब आहे. प्रत्येक काम वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. यापुढेही बैठकीच्या माध्यमातून वेळोवेळी बारामती तालुक्यातील विकासकामांचा आढावा घेण्यात येईल अशा सूचना एकात्मिक समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी दिल्या.
बारामती तालुक्यातील एकात्मिक विकास समन्वय व पुनर्विलोकन समितीची पहिली आढावा बैठक गुरुवारी (दि. ८) प्रशासकीय भवनमध्ये तहसीलदार विजय पाटील यांच्या उपस्थित पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती नीता फरांदे, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, निवासी नायब तहसीलदार धनंजय जाधव, एकात्मिक समितीचे सदस्य सुशांत जगताप, मंगेश खताळ, रमेश इंगुले, वनिता बनकर, अनिता गायकवाड, बाबासाहेब परकाळे, शिवाजीराव टेंगळे, निखिल देवकाते, सर्व विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी व तहसील कार्यालयातील कर्मचारी आदी उपस्थित होते.
होळकर म्हणाले की, तसेच सर्व विभागांनी आणि सदस्यांनी समन्वय ठेवून कामे चांगल्या दर्जाची करावीत, अशा सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या. तहसीलदार पाटील यांनी सर्व संबंधित अधिकारी व प्रतिनिधी यांनी पुढील बैठकीस येण्यापूर्वी आठ दिवस अगोदर तयारी करावी व सर्व माहितीसह बैठकीला उपस्थित राहावे अशा सूचना दिल्या. विकासकामांच्या आड काही अडचणी येत असतील, तर संबंधित विभागांनी त्या आढावा बैठकीत मांडाव्यात जेणे करुन त्यावर मार्ग निघेल, असेही ते म्हणाले.
तहसीलदार विजय पाटील यांनी एकात्मिक विकास समन्वय व पुनर्विलोकन समितीचे कार्यक्षेत्र, उद्दिष्टे व कामांची माहिती दिली. नंतर प्रत्येक विभागाच्या अधिकारी व प्रतिनिधी यांनी त्यांच्या विभागामार्फत बारामती तालुक्यासह शहरात सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिली. यामध्ये किती विकासकामांना मंजुरी मिळाली, त्यातील किती कामे पूर्ण झाली, किती कामे प्रलंबित आहेत, प्रलंबित असल्याची कारणे, कामांस लागणारे अनुदान, प्रलंबित कामे किती दिवसांत पूर्ण होतील याबाबतची माहिती दिली. यावेळी समितीच्या अध्यक्षांनी आणि सदस्यांनी संबंधित विभागास प्रश्न विचारून त्याचे निरसन केले.
समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर यांचा तहसीलदार विजय पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
११०७२०२१-बारामती-०२