नव्या वर्षात विकासकामांचा धडाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:07 AM2021-01-01T04:07:22+5:302021-01-01T04:07:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “कोरोना आपत्तीमुळे सन २०२० हे वर्ष आपत्ती निमुर्लनातच गेले़ या काळात शहरासाठी नवीन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “कोरोना आपत्तीमुळे सन २०२० हे वर्ष आपत्ती निमुर्लनातच गेले़ या काळात शहरासाठी नवीन योजना, विकास कामांना थोडी विश्रांती देत पुणेकरांच्या आरोग्याला प्राधान्य दिले. पुणेकरांच्या सहकार्यामुळे व आरोग्य यंत्रणा व प्रशासनाच्या उत्तम नियोजनामुळे आपण कोरोनाची साथ अटोक्यात आणू शकलो. आता नव्या वर्षात विकासकामांचा धडाका उडवून देऊयात. याची सुुरुवात पूर्व भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पा’च्या उद्घाटनाने होत असल्याचा आनंद आहे. यामुळे लाखो लोकांची तहान भागणार आहे,” अशी भावना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या़
कोरोनावर काही दिवसात लस येईल, ती सर्वांना पोहचेल याचे नियोजन महापालिकेकडून चालू आहे़ याचवेळी शहरातील रखडलेली विकास कामे मार्गी लावण्यासाठीही युध्दपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे़ भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पाबरोबरच स्वारगेट-कात्रज हा बीआरटी मार्गही १ जानेवारीपासून सुरू होत आहे़ सर्वपक्षीय सहकार्य व प्रशासनाचे नियोजन यातून आता उर्वरित विकास कामे मार्गी लावली जातील. महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट होणाऱ्या नवीन २३ गावातील विकासाचे आव्हान सर्वांसमोर आहे़
या गावांचा पुण्यात समावेश झाल्याने त्यांना सर्व मुलभूत सुविधा लवकरात लवकर देण्याचे नियोजन केले आहे. या गावांच्या विकासासाठी स्वतंत्र टीपी प्लॅन (नगर रचना योजना) राबवण्याचा विचार चालू असल्याचे मोहोळ म्हणाले. शहराला बहुप्रतिक्षित असलेली मेट्रो लवकरात लवकर धावावी याकरता प्रयत्न चालू आहेत. कर्वे रस्त्यावरील बहुतांशी काम पूर्ण होत आले असून नव्या वर्षाच्या मध्यापर्यंत या मार्गावर मेट्रो धावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जायका प्रकल्प, शहरातील अरूंद रस्त्यांमुळे रखडलेला विषय, शहरासाठी आरोग्य सुविधांची पुनर्आखणी ही कामे करतानाच, या वर्षात महापालिकेच्या अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रथम वर्षाचे प्रवेशही सुरू होतील, हे सर्वांसाठी उत्साहवर्धक असल्याचे मोहोळ यांनी आवर्जून सांगितले़