शिरूर, खेड, हवेली तालुक्यातील विकासकामांना मिळणार गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:09 AM2021-08-01T04:09:29+5:302021-08-01T04:09:29+5:30

कान्हूरमेसाई : शिरूर लोकसभा मतदारसंघातील खेड, शिरूर आणि हवेली तालुक्यातील खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सुचविलेल्या रु. ८१७.५ लक्ष ...

Development work in Shirur, Khed, Haveli talukas will get momentum | शिरूर, खेड, हवेली तालुक्यातील विकासकामांना मिळणार गती

शिरूर, खेड, हवेली तालुक्यातील विकासकामांना मिळणार गती

Next

कान्हूरमेसाई : शिरूर लोकसभा मतदारसंघातील खेड, शिरूर आणि हवेली तालुक्यातील खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सुचविलेल्या रु. ८१७.५ लक्ष रकमेच्या विविध रस्त्यांच्या कामांना पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) ने सन २०२१-२२ च्या आराखड्यांतर्गत मंजुरी दिली आहे.

कोविड १९ चे जागतिक महामारीच्या काळात केंद्र सरकारने सन २०२०-२१ व २०२१-२२ असा दोन वर्षांचा रु. १० कोटींचा खासदार निधी अन्य कामांसाठी वळविला असला तरी अन्य योजनांतून भरघोस निधी आणण्यात डॉ. कोल्हे यशस्वी झाले असून, मतदारसंघातील विकासकामांचा ओघ त्यांनी कायम ठेवला आहे. ‘पीएमआरडीए’च्या सन २०२१-२२ च्या आराखड्यांतर्गत शिरूर तालुक्यातील मौजे निमगाव भोगी ते सोनेसांगवी (इजिमा १४६) रस्त्याचे बांधकाम करणे (रु. १०१.०० लक्ष), मौजे गणेगाव येथील वरुडे, चिंचोशी, कान्हुर मेसाई (इजिमा १४२) रस्त्याचे बांधकाम करणे (रु. १३५.०० लक्ष), हवेली तालुक्यातील नायगाव थेऊर शिवरस्ता करणे (रु.२८१.५० लक्ष), खेड तालुक्यातील मौजे सुतारवाडी अंतर्गत प्रजिमा १७ ते सुतारवाडी रस्ता सुधारणा करणे (रु. ७५.०० लक्ष), वाफगाव ते मांदळेवाडी (ग्रा.मा.७१) रस्ता करणे (रु. ७५.०० लक्ष), मौजे आखरवाडी अंतर्गत गावठाण ते ढमढेरे वस्ती रस्ता करणे (रु. ७५.०० लक्ष) आणि मौजे तोरणे येथील तोरणे पराळे जोडरस्ता (शिवरस्ता) करणे (रु. ७५.०० लक्ष) आदी रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.

तसेच यापूर्वी कोरेगाव भीमा ते वढू बु. प्रजिमा १९ या ३.२५० कि.मी. लांबीच्या रस्त्यापैकी कि.मी.००/०० ते कि.मी. ९५०/०० लांबीचे १० मीटर रुंदीकरण व काँक्रिटीकरण करण्यासाठी साडेसहा कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे खासदार डॉ. कोल्हे यांनी ‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून आतापर्यंत साडेचौदा कोटींची विकासकामे मंजूर करून आपल्या कामांचा धडाका कायम ठेवला असल्याचे स्पष्ट होत आहे.

या संदर्भात खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, खासदार म्हणून निवडून आल्यानंतर अवघ्या ७-८ महिन्यांत कोविडचे संकट आले. केंद्र सरकारने २ वर्षांचा खासदार निधी रद्द केला. अशा परिस्थितीत विकासकामे करण्यासाठी लोकांच्या अपेक्षांचे खूप मोठे ओझे शिरावर होते. पण त्याही परिस्थितीत मार्ग काढून विकासाची प्रक्रिया अविरत सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करीत होतो. या प्रयत्नांना राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यामुळेच शिरूर लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर निधी आणता आला. याखेरीज आमदार अशोक पवार, आमदार दिलीप मोहिते पाटील यांनीही चांगली साथ दिली. त्यामुळे एकमेकांच्या सहकार्याने मतदारसंघातील विकासकामे करण्यात आम्हाला यश येत आहे.

Web Title: Development work in Shirur, Khed, Haveli talukas will get momentum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.