"अथर्वशीर्ष हे शास्त्र..."; एक लाख पुणेकरांनी केला जागतिक विक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 01:38 PM2023-02-04T13:38:41+5:302023-02-04T13:39:52+5:30
श्री श्री रविशंकर म्हणाले, ‘‘तीक्ष्ण बुद्धी आणि सौम्य भाव हे भारतीय संस्कृतीची देण आहे...
पुणे : ओम गं गणपतये नमः...गणपती बाप्पा मोरया... च्या जयघोषाने भक्तिमय झालेल्या वातावरणात एक लाख पुणेकरांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा जागतिक विक्रम केला. गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या भक्तिउत्सवात अथर्वशीर्ष पठणाचे सूर निनादले. योग, साधना आणि सत्संग या त्रिसूत्रीच्या माध्यमातून जगभरातील लाखो नागरिकांचे आयुष्य बदलणारे श्री श्री रविशंकर यांचे मार्गदर्शन ऐकण्याची संधी या वेळी पुणेकरांना मिळाली.
निमित्त होते, द आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे भक्तिउत्सव या कार्यक्रमाचे. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार शहाजीबापू पाटील, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आर्ट ऑफ लिव्हिंग महाराष्ट्रचे अपेक्स सदस्य राजय शास्तारे, शेखर मुंदडा, डॉ. राजेश धोपेश्वरकर, बलविंदरसिंग चंडोक, धीरज अग्रवाल आदी उपस्थित होते.
आर्ट ऑफ लिव्हिंगचे सुप्रसिद्ध गायक विक्रम हाजरा आणि गायत्री अशोकन् हे सत्संगासाठी उपस्थित होते. सामूहिक अथर्वशीर्ष पठणाच्या जागतिक विक्रमाची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्डस्, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् लंडन येथे झाली. या वेळी या जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र देण्यात आले.
श्री श्री रविशंकर म्हणाले, ‘‘तीक्ष्ण बुद्धी आणि सौम्य भाव हे भारतीय संस्कृतीची देण आहे. ध्यान आणि मंत्रोच्चारण रोज केले तर त्याचे फळ मिळते. ध्यान योगात भक्ती, कर्म आणि ज्ञानयोग आहे. मानसिक शांतीसाठी ध्यान करणे गरजेचे आहे, हे जगातील सर्व देशांनी मान्य केले आहे. प्रत्येक घरात योग पोहोचला पाहिजे. ज्यामुळे प्रत्येक जण निरोगी राहील.”
अथर्वशीर्ष हे शास्त्र : फडणवीस
अथर्वशीर्ष पठण रेकॉर्डच्या माध्यमातून ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचा मान मिळाला, असे सांगून देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अथर्वशीर्ष हे स्थिर बुद्धी देते. गणपती ही बुद्धीची देवता आहे. अथर्वशीर्ष हे शास्त्र आहे. गुरुदेव यांनी भारत आणि जगातील अनेक देशांत भारतीय संस्कृती आणि अध्यात्म जागृत केले. स्वामी विवेकानंदांनी जसे आपल्या विचारांचे श्रेष्ठत्व जगाला पटवून दिले, तेच काम गुरुदेव यांनी केले आहे. विज्ञानातून अध्यात्म हा त्यांच्या कार्याचा गाभा आहे.”