चर्चा तर होणारच ! देवेंद्र फडणवीस अन् चंद्रकांत पाटील पुण्यात; पण वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 01:30 PM2021-02-11T13:30:01+5:302021-02-11T13:54:37+5:30
दादा आणि भाउंच्या वादात फडणवीसांनीच शहराकडे लक्ष द्यायचं ठरवलंय की काय
प्राची कुलकर्णी -
पुणे :भाजप नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज पुणे दौऱ्यावर आहे. याचवेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील पुण्यातच आहे. मात्र फडणवीस आणि पाटील हे पुण्यातील दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थित आहे. यामुळे फडणवीसांच्या पुणे महानगरपालिका भेटी दरम्यान चंद्रकांत पाटील हे अनुपस्थित होते. याच मुद्द्यांवरून राजकीय तर्क वितर्काना उधाण आले होते. पण भाजपकडून याबाबत खुलासा देण्यात आल्यामुळे या विषयावर पडदा पडला.
पुणे महानगरपालिकेला देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस यांनी पुणे महानगरपालिकेच्या विकासकामांची माहिती जाणून घेतानाच विविध मुद्द्यांवर भाष्य देखील केले आहे. पण पुणे महापालिकेतल्या विकास कामांचा आढावा बैठकीला प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटिल मात्र अनुपस्थित राहीले आहेत. विशेष म्हणजे या बैठकीला पदाधिकाऱ्यांव्यतिरिक्त फक्त आमदार आणि खासदारांच आमंत्रण होतं. पाटिल यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय चर्चाना उधाण आले असते तर नवलच म्हणावे लागले असते.
विशेष म्हणजे या बैठकीच्या वेळीच चंद्रकांत पाटील हे पुण्यातच उद्योग आघाडीच्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. महत्वाचं म्हणजे यापुर्वी चंद्रकांत पाटीलांनी गेल्या दोन महिन्यात आयुक्तांसोबत अशाच दोन बैठका घेतल्या आहेत. त्यामुळे पुण्याच्या महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा होत असताना इतर वेळी यासाठी आग्रह असणारे पाटील आज गैरहजर कसे काय याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, फडणवीस आणि पाटील यांचे वेगवेगळे कार्यक्रम ठरलेले असुन या बैठकांनंतर ते पुण्यात भेटणार असल्याचे भाजपचे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी सांगितले.