देवेंद्र फडणवीस राज्यपालांना भेटलेच नाहीत; राजभवनाकडून चुकीची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2022 03:42 PM2022-10-09T15:42:38+5:302022-10-09T15:49:20+5:30
राज्यातील शिंदे आणि फडणवीस सरकारच्या स्थापनेबाबत माहिती अधिकारात धक्कादायक खुलासा
सोमेश्वरनगर : राज्यातील शिंदे आणि फडणवीस सरकारच्या स्थापनेबाबत माहिती अधिकारात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. सत्तास्थापनेवेळी देवेंद्र फडणवीस राज्यपालांना भेटलेच नाहीत असा दावा केला जात आहे. मात्र बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपालांना भेटलेले असतानाही राजभवनातून ते भेटलेच नसल्याची खोटी माहिती माहिती अधिकारात उघड झाली आहे.
सत्तास्थापनेसाठी देवेंद्र फडणवीस कोणत्या तारखेस राज्यपालांना भेटले याची माहिती बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन संजय यादव यांनी मागविली होती. यावर राजभवन कार्यालयाने उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांची राज्यपालांसोबत भेट झाल्याची नोंदच राजभवन दैनंदिन कार्यक्रम पत्रिकेत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. २८ जुन २०२२ रोजी देवेंद्र फडणवीस हे राज्यपाल यांना भेटल्याच्या बातम्या विवीध वृत्तपत्रात व न्युज चॅनेलवर प्रसिद्ध झाल्या आहेत. असे असतानाही राजभवन कार्यालयाने देवेंद्र फडणवीस भेटलेच नसल्याची माहिती दिली आहे. यामुळे देवेंद्र फडणवीस हे राज्यपाल यांना भेटल्याचे खोटे असल्याचा दावा नितीन यादव यांनी केला आहे.
दुसरीकडे राज्यपालांनी नवीन सरकार स्थापनेसाठी ज्यांना निमंत्रण दिले होते. त्याची माहिती तसेच एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापनेसाठी राज्यपालांना दिलेले पत्र याची माहिती राज्यपालांनी अद्यापही त्यांच्याजवळच वैयक्तिक राखुन ठेवली आहे. त्यांच्याच राजभवन कार्यालयासही उपलब्ध करुन दिली नसल्याचे यादव यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही माहिती राज्यपालांनी स्वतःजवळच ठेवण्याचे कारण काय? राज्यपालांना ही माहिती देताना नेमकी कशाची भिती वाटतेय हे वेगळे सांगायची गरज नसल्याचे नितीन यादव यांनी म्हटले आहे.