देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्व वाढवायचं नाही; पवार यांचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 11:45 AM2023-02-18T11:45:48+5:302023-02-18T11:46:07+5:30
पुण्यात पत्रकारांनी कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरणार का, याबाबत विचारले असता, कसबा पोटनिवडणुकीचे उमेदवार मला भेटून गेले. शरद पवार यांचा खोचक टोला
पुणे : राज्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना माहीत होतं, असा दावा नुकताच फडणवीस यांनी केला होता. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. यावर सुरुवातीला शरद पवार यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं होतं; पण आज त्यांनी यावर भाष्य केलं असून, ‘पहाटेच्या शपथविधीबाबत त्यांनाच विचारायची गरज आहे, की इतक्या दिवसांनी त्यांनी हे प्रकरण का काढलं? त्यांच्या वक्तव्याला उत्तर देऊन फडणवीस यांच महत्त्व वाढवायचं नाही,’ असे पवार यांनी म्हटले आहे.
पुण्यात पत्रकारांनी कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरणार का, याबाबत विचारले असता, कसबा पोटनिवडणुकीचे उमेदवार मला भेटून गेले. त्यांनी मला एखादी चक्कर टाका, असे सांगितले. आता एका ठिकाणी गेलं की दोन्ही ठिकाणी (कसबा आणि चिंचवड) जावं लागेल, असे ते म्हणाले.
गिरीष बापट यांच्या यातना वाढू नये, हीच अपेक्षा
खासदार गिरीष बापट हे आजारी असतानाही भाजपने त्यांना पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरवल्याने भाजपवर चौफेर टीका होत आहे. यावरही पवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले, त्यांना प्रचारात आणणे ही भाजपची गरज होती का हे ठाऊक नाही; पण मी गिरीष बापट यांना भेटून आलो होतो. त्यांची प्रकृती पाहता, त्यांच्या यातना वाढू नये, हीच अपेक्षा आहे.
ज्योतिर्लिंगाची जागा बदलण्यापर्यंत मजल गेली
आसाम सरकारने भीमाशंकर ज्योतिर्लिंगावर दावा केला आहे. त्यावरून त्यांनी आसाम सरकारवर टीका केली. १२ ज्योतिर्लिंग कुठे आहेत हे संपूर्ण देशाला माहीत आहे. असे असतानाही ज्योतिर्लिंगाची जागा बदलण्यापर्यंत मजल गेली आहे. त्याविषयी काय सांगायचं..? असे शरद पवार म्हणाले.