देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे केंद्रीय मंत्री झालो; नारायण राणेंचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 12:40 PM2021-12-06T12:40:19+5:302021-12-06T12:40:28+5:30
भारतीय जनता पक्षात आदेश पाळतात त्याप्रमाणे आम्ही फडणवीस यांचा आदेश पाळला
पुणे : पुण्याच्या सिम्बॉयसिस महाविद्यालयातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियम सेंटरला पुण्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेंटरला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज भेट दिली. त्यानंतर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज आपल्याला मंत्रिपद कसे मिळाले याचा खुलासा केला.
राणे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितलं की, तुम्ही दिल्लीत जा आणि सुखी राहा. भारतीय जनता पक्षात आदेश पाळतात त्याप्रमाणे आम्ही फडणवीस यांचा आदेश पाळला. दिल्लीला गेलो आणि आता केंद्रीय मंत्री पदावर आहे. त्यानंतर जम्मू-काश्मीर पासून सुरुवात केली. त्यानंतर आसाम आणि अनेक राज्ये फिरलो. माझ्या आठ नऊ महिन्यांच्या काळात आठ ते नऊ राज्य फिरत पुण्याला आलो आहे.
दर महिन्याला पुण्याला येणारा माणूस आज चार महिन्यानंतर पुण्याला आला. आणि त्याला कारण व्यासपीठावर बसलेले देवेंद्र फडणवीस हे आहेत. पण आता आनंद आहे, आम्ही आता मित्र आहोत. त्यांनी आम्हाला दिल्लीला पाठवलं त्याचा वेगळा आनंद आहे. महाराष्ट्रात असताना मुख्यमंत्री झालो विरोधी पक्षनेते पद सांभाळलं
राज्य सरकारच्या अधिकारानुसार फडणवीस यांनी आरक्षण दिले होते
''मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात फार आंदोलन झाली, विरोधी पक्षांनीही तेव्हा भारतीय जनता पक्षावर, तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर फार टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आरक्षण हे घटनेत बसत नाही, आरक्षणाचा निर्णय केंद्र सरकारने घ्यावा यासारख्या अनेक मागण्या विरोधकांनी लावून धरल्या होत्या. तेव्हा मी महाराष्ट्र आणि तामिळनाडूतील तज्ज्ञांशी चर्चा केली. तेव्हा त्यांनी मला सांगितले की घटनेच्या पंधरा चार आणि सोळा चार कलमानुसार मागासलेल्या वर्गाला आरक्षण देण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत. त्यानुसार देवेंद्र फडणीस त्यांनी आरक्षण दिलं होतं. घटनेनुसार मागास वर्गाला आरक्षण देण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत आणि ते देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.''