स्वीडन आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक संबंधातील नव्या पर्वाची सुरुवात- देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 08:29 PM2023-03-11T20:29:58+5:302023-03-11T20:33:59+5:30

हॉटेल रिट्स कार्लटन येथे आयोजित ‘स्वीडन इंडिया ज्युबिली सेलेब्रेशन’ कार्यक्रमात ते बोलत होते...

Devendra Fadnavis said Beginning of a new era in industrial relations between Sweden and Maharashtra | स्वीडन आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक संबंधातील नव्या पर्वाची सुरुवात- देवेंद्र फडणवीस

स्वीडन आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक संबंधातील नव्या पर्वाची सुरुवात- देवेंद्र फडणवीस

googlenewsNext

पुणे : स्वीडन इंडिया ज्युबिली सेलेब्रेशन कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वीडन आणि महाराष्ट्रात औद्योगिक भागीदारी अधिक दृढ होऊन या क्षेत्रातील नव्या पर्वाची सुरूवात होईल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. हॉटेल रिट्स कार्लटन येथे आयोजित ‘स्वीडन इंडिया ज्युबिली सेलेब्रेशन’ कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाला स्वीडनचे परराष्ट्र व्यापार सचिव हॅकन जेवरल, भारताचे स्वीडनमधील राजदूत तन्मय लाल, स्वीडनचे राजदूत जॅन थेस्लेफ, स्वीडनच्या मुंबई येथील कॉन्सुल जनरल ॲना लेकवॉल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन शर्मा, उद्योजक बाबा कल्याणी, स्वीडिश चेंबर ऑफ कॉमर्सचे कमल बाली आणि वरिष्ठ स्वीडिश व्यावसायिक उपस्थित होते.

येत्या काळात स्वीडनमधून अधिक प्रमाणात उद्योग महाराष्ट्रात येतील

पुणे हे स्वीडनमधील उद्योजकांचे 'सेकंड होम' आहे असे नमूद करून उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. पुण्यातील औद्योगिकरणाला स्वीडनमधील उद्योगाच्या स्थापनेने सुरुवात झाली. क्लीन अँड ग्रीन एनर्जी, क्लीन ट्रान्स्पोर्टेशन, ग्रीन हायड्रोजन, सोलर एनर्जी आदी क्षेत्रात महाराष्ट्र आणि स्वीडनला परस्पर सहकार्याची संधी आहे. उद्योगाच्या क्षेत्रात परस्पर संबंधातील ही भागीदारी पुढे नेण्यासाठी महाराष्ट्र उत्सुक आहे. येत्या काळात स्वीडनमधून अधिक प्रमाणात उद्योग महाराष्ट्रात येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

स्वीडन आणि भारत यांच्यातील संबंध दीर्घकालीन असले, तरी विशेषत: तीन दशकांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वीडन भेट ऐतिहासिक होती आणि या काळात दोन्ही देशांमधील धोरणात्मक सहकार्य मजबूत करण्याचे प्रयत्न निर्णायक ठरले आहेत. स्वीडनच्या महाराष्ट्राशी असलेल्या या औद्योगिक संबंधांना 75 वर्षे होत असल्याचा आनंद आहे. स्वीडनच्या उद्योगांसाठी महाराष्ट्र हे महत्वाचे राज्य आहे. उद्योगाच्यादृष्टीने महाराष्ट्र देशाचे ‘पॉवर हाऊस’ आहे. महाराष्ट्रात उद्योगांसाठी सुलभ वातावरण लक्षात घेता स्वीडन आणि महाराष्ट्रातील औद्योगिक भागीदारी अधिक विस्तारेल, असेही फडणवीस म्हणाले.

जेवरेल म्हणाले, उद्योगाच्या क्षेत्रात स्वीडनचे महाराष्ट्राशी दीर्घकालीन संबंध आहेत. हे संबंध अधिक दृढ होतील आणि नव्या पिढीला त्याचा लाभ होईल. महाराष्ट्रातील औद्योगिक विकासासाठी  स्वीडनतर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल. उद्योजक बाबा कल्याणी म्हणाले, स्वीडन तंत्रज्ञान, नाविन्यता, कौशल्य आणि डीजीटल तंत्रज्ञान क्षेत्रात पुढे आहे, तर भारत सर्वात मोठी बाजारपेठ आहे. औद्योगिक क्षेत्रातील सहकार्य दोघांसाठी उपयुक्त ठरेल. विशेषत: वाहन उद्योग क्षेत्रात भागीदारीची मोठी संधी आहे.

यावेळी इतरही उद्योजक प्रतिनिधींनी विचार व्यक्त केले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत  स्वीडन इंडिया बिझिनेस कौन्सिल आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यात वेस्ट टू एनर्जी, पायाभूत सुविधा आणि हेल्थ केअर क्षेत्रातील सहकार्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी स्वीडन इंडिया बिझनेस कौन्सिलचे सदस्य आणि सेरनेके इंटरनॅशनलचे अध्यक्ष प्रशांत अग्रवाल उपस्थित होते.

Web Title: Devendra Fadnavis said Beginning of a new era in industrial relations between Sweden and Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.