Jayant Patil: देवेंद्र फडणवीसांना कुसुमाग्रजांबद्दल अनादर, सतत सावरकरांचा उल्लेख; जयंत पाटलांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 06:50 PM2021-12-04T18:50:06+5:302021-12-04T19:44:51+5:30
'देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा सुशिक्षित आणि अतिशय समंजस नेतृत्वाने जर कुसुमाग्रज यांच्याबद्दल अशी भावना व्यक्त केली असेल तर हे फार मोठे दुर्दैव आहे...!'
पुणे: नाशिक ही कुसुमाग्रजांची भूमी आहे. देशातील आणि मराठी भाषेतील थोर साहित्यिक म्हणून कुसुमाग्रज यांबद्दल कायम आदर आहे. परंतु देवेंद्र फडणवीस हे कुसुमाग्रज यांच्याबद्दल अनादर दाखवत असतील तर हा साहित्य आणि संस्कृती समोरील सर्वात मोठा यक्षप्रश्न आहे. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूर जावी यासाठी ते सतत स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख करत असतात. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाचा वापर साहित्य संमेलनातील राजकारणासाठी करू नये, अशा शब्दात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना सल्ला दिला. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आज पुण्यातील सिंचन भवन येथे एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नाशिक येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबद्दल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावावरून संमेलनाच्या आयोजकांना त्यांनी टोला लगावत संमेलनाला उपस्थित राहणार नसल्याचे म्हटले आहे. त्यावर बोलताना जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.
जयंत पाटील म्हणाले, नाशिक ही कुसुमाग्रजांची भूमी आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा सुशिक्षित आणि अतिशय समंजस नेतृत्वाने जर कुसुमाग्रज यांच्याबद्दल अशी भावना व्यक्त केली असेल तर हे फार मोठे दुर्दैव आहे. कुसुमाग्रज यांचा अपमान करणे म्हणजे मराठी भाषेचा, मराठी वांगमयाचा, मराठी भाषिकांचा अपमान आहे. केवळ शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसपासून बाजूला जावी म्हणून फडणवीस सातत्याने सावरकरांचा विषय काढत असतील तर त्यांनी हे करू नये अशी माझी त्यांना सूचना आहे.