कोरेगाव भीमा दंगलीची देवेंद्र फडणवीसांना माहिती नव्हती, प्रकाश आंबेडकरांचा दावा

By नितीन चौधरी | Published: August 30, 2023 06:38 PM2023-08-30T18:38:17+5:302023-08-30T18:39:15+5:30

फडणवीस यांना दंगलीची माहिती मिळाली असती तर त्यांनी पुण्यात येऊन दंगलीचा आढावा घेतला असता...

Devendra Fadnavis was not aware of Koregaon Bhima riots, claims Prakash Ambedkar | कोरेगाव भीमा दंगलीची देवेंद्र फडणवीसांना माहिती नव्हती, प्रकाश आंबेडकरांचा दावा

कोरेगाव भीमा दंगलीची देवेंद्र फडणवीसांना माहिती नव्हती, प्रकाश आंबेडकरांचा दावा

googlenewsNext

पुणे : तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीची माहिती पोचवली गेलीच नाही. त्यांना याबाबत माहितीच देण्यात आली नाही, अशी माझी माहिती आहे. फडणवीस यांना दंगलीची माहिती मिळाली असती तर त्यांनी पुण्यात येऊन दंगलीचा आढावा घेतला असता, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.

कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीसंदर्भात आयोगापुढे त्यांची बुधवारी (दि. ३०) साक्ष नोंदविण्यात आली. आयोगाचे अध्यक्ष जे. एन. पटेल आणि सदस्य सुमित मलीक यांच्या दोन सदस्यीय आयोगाने ही साक्ष सकाळी साडेअकरा ते दुपारी पावणेतीन वाजेदरम्यान नोंदवली. नोंदवली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आंबेडकर यांच्या वतीने अॅड. किरण कदम यांनी काम पाहिले. तर आंबेडकर यांची मिलिंद एकबोटे यांच्यातर्फे अॅड. एस. के. जैन तसेच माळवदकर, जमादार कुटुंबियातर्फे रोहन माळवदकर यांनी उलटतपासणी केली. येत्या १६ सप्टेंबरला त्यांची पुन्हा साक्ष होणार आहे.

हे अपयश कोणाचे?

आंबेडकर म्हणाले, “तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक जानेवारीला कोरेगाव भीमापासून ४० किलोमीटर अंतरावर नगर जिल्ह्यात होते. ११.३० ते ११.४० या दरम्यान त्यांचे हेलिकॉप्टर ‘टेक ऑफ’ झाले आहे. ही दंगल सकाळी झाल्याने त्यांना कळले असते तर पुण्यात येऊन त्यांनी दंगलीची माहिती घेतली असती. मात्र, त्यांना दंगलीची माहितीच मिळाली नाही, अशी माझी स्वतःची माहिती आहे. त्यामुळे हे प्रशासकीय की राजकीय अपयश आहे याचा तपास आयोगाने करावा अशी मागणी आयोगाकडे केली आहे.”

पोलिस अधिक्षक कोठे होते?
पोलिस अधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्रे आयोगासमोरील साक्षीदरम्यान आली आहेत. पण त्यात तेथील ग्रामपंचायतींने दंगलीसंदर्भातील ठराव दिले होते. ही दंगल घडविण्यात आलेली आहे. व्हाट्स अॅपवर आलेले चॅट, एकमेकांमबद्दल बदललेली माहिती ही सर्व कागदपत्रे आयोगासमोर सादर करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. आयोगाकडे सादर केलेल्या कागदांवरून कोल्हापूर परिक्षेत्राच्या गुप्तचर विभागाकडे या दंगलीबाबत नेमकी काय माहिती होती याची माहिती आयोगाने विचारावी. तसेच पुण्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक हे त्या वेळी कोठे होते आणि त्यांची भूमिका काय होती हे तपासण्यात यावे. माझ्या माहितीप्रमाणे पोलिसांच्या काही विभागांनी या दंगलीबाबत दोन दिवस आधी माहिती गोळा केली होते. त्यांच्याकडून ही माहिती वरिष्ठ पातळीवर जाऊ दिली नाही. गृह सचिव, मुख्यमंत्री यांच्यापर्यंत किती वाजता ही माहिती दिली हे तपासणे गरजेचे आहे, अशी आयोगाला विनंती केल्याचे त्यांनी सांगितले.

रश्मी शुक्ला यांना यावेच लागेल

आयोगासमोर पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांचीही बुधवारीच साक्ष नोंदविण्यात येणार होती. मात्र, त्या अनुपस्थित राहिल्या याबाबत ते म्हणाले, “शुक्ला यांना आयोग कधीही समन्स काढू शकते. त्यांना समन्स टाळता येणार नाही. त्या आयोगासमोर का येत नाहीत ते प्रतिज्ञापत्र आल्याशिवाय कळणार नाही.”

Web Title: Devendra Fadnavis was not aware of Koregaon Bhima riots, claims Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.