देवगड हापूसचे बाजारात आगमन, पुण्यात हंगामातील पहिली आवक : पेटीला पाच हजार रुपये दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 05:34 AM2018-02-12T05:34:39+5:302018-02-12T05:34:59+5:30
१५ दिवसांपासून रत्नागिरी हापूस बाजारात दाखल झाला असून ग्राहकांकडून त्याला पसंती मिळत आहे. रविवारी बाजारात रत्नागिरी हापूसची ५० पेटी आवक झाली.
पुणे : देवगड हापूसचा हंगाम सुरू झाला असून पुण्यात रविवारी चालू हंगामातील देवगड हापूस दाखल झाला. मार्केट यार्डातील फळबाजारात देवगड हापूसची सहा पेटी आवक झाली. देवगडच्या पाच ते सहा डझनाच्या पेटीला पाच हजार रुपये दर मिळाला.
हवामानातील बदलामुळे देवगड हापूसचा हंगाम सुरू होण्यास १० ते १५ दिवस उशीर झाला. मात्र, कुणकेश्वर येथील शंकर नाणेरकर या शेतक-याच्या शेतातील पहिला देवगड हापूस पुण्यात दाखल झाला. पातळ कातडीचा अधिक गर असलेला आणि चवीला गोड असल्याने या आंब्याला ग्राहकांकडून अधिक मागणी असते. तसेच अधिक उष्ण हवामानात हा आंबा टिकत नाही. त्यामुळे फेब्रुवारीमध्येच देवगड हापूसला सुरुवात होते. तसेच मार्च-एप्रिल महिन्यातच देवगड हापूसचा ८० टक्के हंगाम संपतो. त्यातच ग्राहकांकडूनही या आंंब्याला अधिक मागणी असते. येत्या आठवड्याभरात देवगड हापूसची सुरळीत आवक सुरू होईल, असे आंब्यांच्या व्यापाºयांनी सांगितले.
आंब्याचे व्यापारी युवराज काची म्हणाले, की देवगड हापूसची अजूनही लोखंडी ट्रंकेतून आवक होत आहे. अधिक उष्ण वातावरणात तो टिकत नाही. एप्रिल ते जूनदरम्यान हा आंबा खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे देवगड हापूसचा हंगाम लवकर संपतो. पुण्यात प्रथमच सहा पेटी आवक झाली असून मज्जीद बागवन यांनी देवगड हापूसची खरेदी केली आहे. हंगाम आणखी लवकर सुरू झाला असता, तर एका पेटीला १० हजार रुपयांचा दर मिळाला असता.
१५ दिवसांपासून रत्नागिरी हापूस बाजारात दाखल झाला असून ग्राहकांकडून त्याला पसंती मिळत आहे. रविवारी बाजारात रत्नागिरी हापूसची ५० पेटी आवक झाली.
४-६ डझनाच्या पेटीला ३ ते ५ हजार रुपये दर मिळत आहे.