भंडार-खोबऱ्याची मुक्तहस्ते उधळण करीत जेजुरीत कुलदैवताचे भाविकांनी घेतले दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 06:33 PM2017-12-18T18:33:35+5:302017-12-18T18:39:45+5:30

सोमवती यात्रेनिमित्त तीर्थक्षेत्र जेजुरीत दोन लाखाहून अधिक भाविकांनी ‘सदानंदाचा यळकोट, यळकोट यळकोट जय मल्हार’च्या जयघोषात आणि भंडार-खोबऱ्याची मुक्तहस्ताने उधळण करीत कुलदैवताचे दर्शन घेतले. 

The devotees celebrate somavati amavasya yatra in jejuri khandoba | भंडार-खोबऱ्याची मुक्तहस्ते उधळण करीत जेजुरीत कुलदैवताचे भाविकांनी घेतले दर्शन

भंडार-खोबऱ्याची मुक्तहस्ते उधळण करीत जेजुरीत कुलदैवताचे भाविकांनी घेतले दर्शन

googlenewsNext
ठळक मुद्देवर्षातून दोन वेळा भरणाऱ्या खास सोमवती यात्रांना विशेष महत्त्वहजारो भाविकांच्या उपस्थितीत दही, दूध, कऱ्हेचे पाणी आदींसह देवाला घालण्यात आले स्नान

जेजुरी : सोमवती यात्रेनिमित्त तीर्थक्षेत्र जेजुरीत दोन लाखाहून अधिक भाविकांनी ‘सदानंदाचा यळकोट, यळकोट यळकोट जय मल्हार’च्या जयघोषात आणि भंडार-खोबऱ्याची मुक्तहस्ताने उधळण करीत कुलदैवताचे दर्शन घेतले. 
वर्षातून दोन वेळा भरणाऱ्या खास सोमवती यात्रांना विशेष महत्त्व असते. सोमवारी सोमवती यात्रेनिमित्त राज्यभरातून आलेल्या भाविकांनी जेजुरीत मोठी गर्दी केली होती. सोमवती अमावस्येला रविवारी (दि. १७) सकाळी ११.५९ वाजता प्रारंभ झाला होता. ती आज सकाळी १२ वाजेपर्यंतच पुण्यकाळ होता. यामुळे सूर्याला अमावस्या असतानाच देवाच्या उत्सवमूर्तींना कऱ्हेचे स्नान घालणे आवश्यक असते. आज सोमवारी पहाटे ६ वाजता जेजुरीगडावरून उत्सवमूर्तीची पालखी काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पहाटेचे झुंजुमुंजू वातावरण आणि थंडी असूनही सोहळ्यात सहभागी होण्यासाठी लाखो भाविकांनी जेजुरीत व गडावर गर्दी केलेली होती.
देवसंस्थानचे विश्वस्त संदीप जगताप, तुषार सहाणे, शिवराज झगडे व पंकज निकुडे उपस्थित होते. पहाटे ६ वाजता उत्सवमूर्तीच्या पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. गडकोटातील प्रमुख मंदिराच्या प्रदक्षिणेनंतर भंडारगृहातील श्रीखंडोबा व म्हाळसादेवींची उत्सवमूर्ती पालखीत ठेवण्यात आली. निशाण, अश्व, चामरे, आबदानी, सनई चौघडा, तसेच सोलो वादनाच्या मंगल सुरात सोहळा सुरू झाला. अत्यंत उत्साहात पालखीचे खांदेकरी, मानकरी पालखीला खांद्यावर घेऊन गडकोटातून बाहेर पडत होते. यावेळी उपस्थित भाविकांकडून देवाचा जयघोष सुरू होता, तर भंडार-खोबºयाची मुक्त हस्ताने उधळण होत होती. विद्युत प्रकाशझोतातील सोहळ्यावर भंडाऱ्याची होणारी उधळण सोन्याच्या जेजुरीचा अनुभव देत होती. 
गडकोटातून बाहेर पडलेला हा सोहळा मुख्य पायरीमार्गावरून नंदी चौकात आला. तेथून ऐतिहासिक चिंचबागेतील छत्री मंदिराचा मान स्वीकारून सोहळ्याने कऱ्हेकडे कूच केले. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या भाविकांकडून या सोहळ्यावर मुखातून देवाचा जयघोष आणि भंडार- खोबऱ्याची उधळण होत होती. सकाळचा सोहळा असून ही राज्यभरातील भाविकांची मोठी गर्दी जाणवत होती. शहरातील मुख्य चौकातून निघालेल्या सोहळ्याने जेजुरी ते कऱ्हा नदी ५ किलोमीटरचे अंतर पार करीत सकाळी १०.३० वाजता कऱ्हेकाठी पोहोचला. या ठिकाणी हजारो भाविकांच्या उपस्थितीत दही, दूध, कऱ्हेचे पाणी आदींसह देवाला स्नान घालण्यात आले. उत्सवमूर्तींची विधिवत पूजा व समाजआरती उरकण्यात आली. देवाच्या स्नानाबरोबरच उपस्थित हजारो भाविकांनी ही कऱ्हास्नान उरकले. यानंतर सोहळ्याने माघारीचे प्रस्थान ठेवले. 
सोहळ्याने धालेवाडी, कोरपडमळामार्गे ठिकठिकाणच्या पालखी मार्गावरील मानकऱ्यांचा मान स्वीकारत ग्रामदेवता जानाईदेवीच्या प्रांगणात दुपारी दीड वाजता येऊन विसावला. संपूर्ण दिवसभर उत्सवमूर्तींची पालखी या ठिकाणी दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. सायंकाळी जानाई मंदिरातून सोहळ्याने गडाकडे कूच केले. 


रविवारी व सोमवारी अमावस्येचा पर्वकाल असल्याने सलग दोन दिवस जेजुरीत भाविकांची प्रचंड गर्दी होती. जेजुरीगडाच्या दर्शनाबरोबरच जयाद्रीच्या डोंगररांगांतील कडेपठार मंदिरातही भाविकांची मोठी गर्दी होती. पुणे, मोरगाव, नीरा आदी मार्गांवर जेजुरीत येणाऱ्या वाहनांची सुमारे दोन-दोन किलोमीटरच्या रांगा लागलेल्या होत्या. यामुळे वाहतुकीच्या नियंत्रणाचा पोलिसांवर मोठा ताण येत होता. मात्र पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे वाहतूक संथगतीने, पण व्यवस्थित राहिली होती. मोठ्या वाहनांना शहरात बंदी केलेली असल्याने नियोजित वाहनतळे वाहनांनी भरून गेली होती. वाहने बाहेरच राहिल्याने शहरात गर्दीचा ताण कमी राहिल्याने भाविकांना गडकोटाकडे जाऊन दर्शन घेणे सुलभ झाले. यात्रेच्या बंदोबस्तासाठी सुमारे ११० पोलीस कर्मचारी आणि १२ पोलीस अधिकारी तैनात केले होते. जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीसनिरीक्षक डी.एस.हाके यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नियोजन करण्यात आले होते. एसटी महामंडळाकडूनही जादा बसगाड्यांची सोय केलेली होती. सोमवती यात्रेचा सोहळा पहाटेच्या वेळी असल्याने त्यातच प्रचंड गर्दी राहिल्याने खिसेकापूंनी चांगलाच हात मारला. साखळीचोरी, मोबाइलचोरी, खिसेमारीचे असंख्य प्रकार घडले आहेत.   
सकाळी ११ वाजता उत्सवमूर्तींचे कºहास्नान उरकल्यानंतर भाविक आपापल्या वाहनाने किंवा मिळेल त्या वाहनाने माघारी जात होते. सायंकाळपर्यंत संपूर्ण शहर मोकळे झाले होते. 

Web Title: The devotees celebrate somavati amavasya yatra in jejuri khandoba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.