Pune: बाभळीच्या काटेरी ढिगावर भाविकांनी घेतल्या उड्या, काटेबारस यात्रा मोठ्या उत्साहात साजरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 01:03 PM2023-11-25T13:03:39+5:302023-11-25T13:03:48+5:30

उघड्या अंगाने काटेरी ढिगावर लोळणारे भक्त पाहण्यासाठी राज्यासह परराज्यातील हजारोंच्या संख्येत शिवभक्त उपस्थित होते. काटेरी ढिगावर लोळणारे भक्त पाहून लोकांच्या डोळ्याचे पारणे फिटले....

Devotees jump on the prickly pile of acacia, Katebaras Yatra is celebrated with great enthusiasm | Pune: बाभळीच्या काटेरी ढिगावर भाविकांनी घेतल्या उड्या, काटेबारस यात्रा मोठ्या उत्साहात साजरी

Pune: बाभळीच्या काटेरी ढिगावर भाविकांनी घेतल्या उड्या, काटेबारस यात्रा मोठ्या उत्साहात साजरी

नीरा (पुणे) : हर हर भोले.. हर हर.. महादेव.... ज्योतिर्लिंग महाराज की जय.... या गगनभेदी जयघोषात भक्ती आणि शक्तीची प्रेरणा देणाऱ्या श्री. ज्योतिर्लिंगाची काटेबारस यात्रा मोठ्या उत्साहात साजरी झाली. भगवान शिवाप्रती असलेल्या श्रद्धेने बाभळीच्या काटेरी ढिगावर भाविकांनी उड्या घेतल्या. उघड्या अंगाने काटेरी ढिगावर लोळणारे भक्त पाहण्यासाठी राज्यासह परराज्यातील हजारोंच्या संख्येत शिवभक्त उपस्थित होते. काटेरी ढिगावर लोळणारे भक्त पाहून लोकांच्या डोळ्याचे पारणे फिटले.

पुरंदर तालुक्यातील गुळुंचे गावचे ग्रामदैवत असलेल्या ज्योतिर्लिंग महाराजांची यात्रा दिवाळी पाडव्याला सुरुवात झाली होती. प्रतिपदेला घटस्थापना झाल्यानंतर काकड आरती, शिवनाम जप, ध्यान, आरत्या, शिवालीलामृताचे पठन, भजन, कीर्तन सुरू झाले होते. प्रतिपदेच्या दुसऱ्या दिवसापासून अकरा रात्री अनवाणी पायाने भक्त देवाप्रती आपली श्रद्धा छबिन्यात नाचून व्यक्त केली. कुटुंबातील किमान एक सदस्याने गोडाचा उपवास केला जातो. बुधवारी रात्री देवाची पालखी उत्सव मूर्तीसह ग्रामप्रदक्षिणा करण्यासाठी छबिन्यासह निघाली. एकादशीला (गुरुवारी) सकाळी ११ वाजता पालखीतून उत्सव मूर्ती व मानाच्या कठीला नीरा नदीत स्नानासाठी नेण्यात आल्या. यावेळी गुळुंचेची ज्योतिर्लिंगाची, कर्नलवाडीच्या जोतिबाची उत्सवमूर्ती तसेच देवाची बहीण समजली जाणारी काठीसह रथातून नीरेकडे मार्गक्रमण केले. दुपारच्या सुमारास उत्सवमूर्तींना व काठीला प्रसिद्ध दत्तघाटावर स्नान घालण्यात आले. नीरा बाजारपेठेतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी पालखी गुळुंचे गावात दाखल झाल्यानंतर दोन्ही पालख्या गायकवाड वस्तीतील विसावा स्थळावर विसावल्या. रात्री कीर्तन संपल्यावर छबिन्याला सुरुवात केली गेली.

आज (शुक्रवारी) द्वादशीला पहाटे साडेतीन वाजता शिवभक्तांनी मंदिराशेजारी अंघोळ करून गावाबाहेरील मानाच्या कठीचे दर्शन घेऊन मंदिरातपर्यंत दंडवत घातले. दंडवतात यावर्षी थंडी जास्त जाणवली. तरीही भक्तांनी तोही क्षण आनंदाने साजरा केला. गुळुंचे गावसह १२ वाड्यातील ग्रामस्थांनी ग्रामदैवतास पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला. मानकऱ्यांनी व नवस फेडणाऱ्यांनी मुख्य कळसावर दस बांधले. साडेदहा वाजता ढोलांचे पूजन झाले. त्यानंतर मंदिरासमोर ढोलांचा आवाज घुमू लागला. भक्त मोठ्या उत्साहात छबिन्याच्या खेळ खेळू लागले. ढोल, ताशे व झांजेच्या कडकडाटात अवघा आसमंत घुमू लागला होता. भक्तांनी एकमेकांवर मुक्तपणे गुलाल-खोबऱ्याची उधळण करत हर भोला हर... महादेवाची गर्जना केली. बाराच्या सुमारास मंदिरातून उत्सव मूर्तीसह दोन्ही पालख्या गावाबाहेरील काठीच्या भेटीसाठी वाजत गाजत निघाल्या.

यावेळी छबिन्यात आडवा डाव खेळला गेला. छबिन्याच्या मागे भजनी मंडळ भजन गात होते. पालख्यांनी काठीला प्रदक्षिणा घालून आरती झाली. या दरम्यान साडेबारा वाजता मंदिरासमोर मानकऱ्यांनी डोक्यावर बाभळीच्या काट्यांच्या फास जमा केले. काटेरी फास गोलाकार पद्धतीने मांडले गेले. गायकवाड परिवारातील सदस्यांनी काट्यांचे पूजन केले. एव्हाना मानाची काठी व दोनही पालख्या मंदिराकडे मार्गस्त झाल्या.

दुपारी एक ते तीन या दोन तासात २४० भक्तांनी काट्याच्या ढिगांवर मनसोक्तपणे लोळण घेतली. काही भक्तांनी एक दोन तर काहींनी अक्षरशः पाच ते सात उड्या घेतल्या. काटेरी ढिगावर उघड्या अंगाने लोळणारे भक्त पाहून भाविकांच्या डोळ्याचे पारणे फिटले. भगवान शिवाप्रति असलेली भक्तांची असीम श्रद्धा यावेळी दिसून आली. काट्यांवर मुक्तपणे लोळल्यानंतर भक्तांना मंदिरात घेऊन जात होते. यात्रेत युवकांनी भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जात होती. मानाची शेवटच्या भक्ताने उडी मारल्यानंतर काटेरी फास जाळून टाकण्यात आले. यात्रेची सांगता त्रिपुरा पौर्णिमेला दीपक लावून होणार आहे.

Web Title: Devotees jump on the prickly pile of acacia, Katebaras Yatra is celebrated with great enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.