कोरोनाचे संकट टळावे म्हणून जेजुरी गडावर भक्तांचे कुलदैवताला साकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 12:26 IST2020-03-16T12:26:25+5:302020-03-16T12:26:58+5:30
महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ३१वर पोहचली असून पुण्यात त्याचे १६ रुग्ण आढळून आले आहे.

कोरोनाचे संकट टळावे म्हणून जेजुरी गडावर भक्तांचे कुलदैवताला साकडे
जेजुरी: जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे.त्यात चीनसह अन्य देशासह अनेक नागरिकांचा दगावले आहे. देश विदेशातील सरकारी प्रशासन, डॉक्टर, कर्मचारी यांच्याकडून कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. कोरोना हा संसर्गजन्य असल्याने त्याचा प्रादुर्भावासाठी रोखण्यासाठी अनेक प्रकारे जनजागृती करण्यात येत आहे.राज्य सरकारकडून देखील शाळा, महाविद्यालये, सिनेमागृह, नाट्यगृह यांच्या बंदसोबतच सामाजिक, राजकीय, धार्मिक सोहळे यांना परवानगी नाकारण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र दिवसेंदिवस तो कमी होण्याऐवजी त्याचा संसर्ग वाढत आहे. मात्र, जागतिक पातळीसह राज्यावरील कोरोनाचे संकट टळावे यासाठी महाराष्ट्राच्या कुलदैवताला सोमवारी साकडे घालण्यात आले.
महाराष्ट्राचे लोकदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबाला भक्तांनी आज महापूजा, दुग्धअभिषेक घालून कोरोनाचा प्रसार फैलाव होऊ नये. हा आजार नष्ट व्हावा, त्याच्यावर लवकरात लवकर लस निर्माण व्हावी, जगभरातून कोरोनाचा समूळ उच्चाटन व्हावे म्हणून मल्हार भक्त गण पुणे, नित्य वारकरी खांदेकरी,मानकरी, सेवेकरी जेजुरी, श्री ओम भक्तगण पुणे यांच्या वतीने साकडे घालण्यात आले. महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ३१वर पोहचली असून पुण्यात त्याचे १६ रुग्ण आढळून आले आहे. कोरोनाचा झपाट्याने होणारा फैलाव रोखण्याची आव्हान प्रशासनासह सर्वांच्याच समोर आहे.