ओझरमध्ये पायरीचे दर्शन घेऊन भाविक परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:14 AM2021-08-26T04:14:26+5:302021-08-26T04:14:26+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या ओझरचे विघ्नेश्वर मंदिर बंद आहे. मात्र दररोजचे धार्मिक विधी मात्र सुरु आहेत. संकष्टीला गणेशाची विशेष पूजा ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या ओझरचे विघ्नेश्वर मंदिर बंद आहे. मात्र दररोजचे धार्मिक विधी मात्र सुरु आहेत. संकष्टीला गणेशाची विशेष पूजा असते. त्यात श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी असल्याने गणेशाच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करत असतात. मात्र कोरोनामुळे या महत्त्वाच्या दिवशीही मंदिर भाविकांसाठी खुले करता आले नसल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष बी. व्ही. मांडे व विश्वस्त गणेश कवडे यांनी दिली.
संकष्टीनिमित्त गणेशाच्या पूजा-विधी मात्र नियमानुसार झाल्या. मंदिराचे पुजारीवृंदानी सर्व धार्मिक विधी पार पाडला. पहाटे पाचला देवस्थानचे पुजारी हेरंब जोशी यांनी मंत्रोच्चारात विधिवत महापूजा व आरती केली. सकाळी साडेसात, दुपारी बारा वाजता महाआरती व रात्री साडेदहाला शेजारती आणि महानैवेद्य अर्पण केला.
भाविकांनी श्रींच्या पायरीचे दर्शन घेतानाही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले. श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी कारखान्याच्या माध्यमातून प्रसाद म्हणून एक साखरपोते श्रींना अर्पण केले. एरव्ही प्रत्येक संकष्टीला गजबजलेल्या ओझरमध्ये श्रावणातल्या संकष्टीलाही शुकशुकाट दिसत होता. मात्र दुसरीकडे ओझर ग्रामस्थ व देवस्थान यांनी कोरोनाचा विविध सामाजिक उपक्रम राबविला.
--
फोटो क्रमांक : २५ओझर विघ्नेश्वर
फोटो ओळी : श्रीक्षेत्र ओझर येथे भाविकांनी सोशल अंतराची मर्यादा पाळत पायरी दर्शन घेतले.