दारुच्या नशेत उलटी केल्याने ढाबा मालकाची बेदम मारहाण; वेटरचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 04:28 PM2021-07-05T16:28:18+5:302021-07-05T16:42:20+5:30
जेजुरीच्या माळशिरस येथील घटना, ढाबा मालकाला अजून एका वेटरसह अटक
जेजुरी: जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माळशिरस येथील एका ढाबा मालकाने वेटरला बेदम मारहाण केल्याने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मारहाणीत खून झाल्याचे लपवण्यासाठी केलेला बनाव ही उघडकीस आल्याने ढाबा मालकाला एका वेटरसह जेजुरी पोलिसांनीअटक केली आहे. ढाबा मालक राजेंद्र विलास बनकर (वय २५) आणि वेटर तुफान उर्फ मीर न्यूटन अली (वय ३२) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
जेजुरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माळशिरसमध्ये गेल्या महिन्यात २३ जूनला रात्री हॉटेल शिव दरबार ढाबा येथे वेटर दीपक ( पूर्ण नाव व पत्ता मिळालेला नाही ) याने ढाबा मालकासमोर दारूच्या नशेत उलटी केली. त्यावेळी मालक राजेंद्र बनकर आणि दुसरा वेटर तुफान अली या दोघांनी चप्पल व काठीने त्याला बेदम मारहाण केली. यात तो निपचित पडला होता.
दुसऱ्या दिवशीही निपचित पडलेला वेटर उठला नाही. म्हणून मालकाने त्याला पुणे ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. यावेळी त्यांनी वेटर हा अज्ञात इसम असून तो नशेत खाली पडला होता. त्याला आम्ही उपचारासाठी घेऊन आलो असल्याचा बनाव केला या दोघांनी केला. त्याला रुग्णालयात दाखल करून तेथून लगेच त्यांनी पोबारा केला होता.
सदर वेटरचा डोक्याला मार लागून मृत्य झाल्याची खबर ससून रुग्णालयाकडून बंडगार्डन पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. ही घटना जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने तो गुन्हा जेजुरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. घडलेल्या गुन्ह्याची माहिती घेत असताना माळशिरस परिसरात या घटनेबाबत कुजबुज सुरू होतीच. हाच धागा पकडून जेजुरी पोलिसांनी एक पथक बनवून गुप्त तपास सुरू केला.
या तपासात आरोपींनीच हा गुन्हा केल्याची उकल झाली. दीपक वेटर याला पुणे रेल्वे स्टेशन येथून आरोपी राजेंद्र बनकर याने ढाब्यावर वेटर कामासाठी आणलेले होते. दोन्ही आरोपीना जेजुरी पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्याखाली अटक केली असून सासवड न्यायालयाने आरोपीना येत्या ८ जुलै पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. पुढील तपास जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक हे स्वतः करीत आहेत.