नीरा व मांडकी हॉटस्पॉट गावांत धडक सर्वेक्षण मोहिम.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:10 AM2021-07-16T04:10:07+5:302021-07-16T04:10:07+5:30
नीरा : नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील नीरा व मांडकी ही गांवे कोरोना हॉटस्पॉट ठरल्याने मंगळवारी व बुधवारी या ...
नीरा :
नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील नीरा व मांडकी ही गांवे कोरोना हॉटस्पॉट ठरल्याने मंगळवारी व बुधवारी या दोन दिवसांत नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा स्वयंसेविका यांच्या पथकाने नीरा येथील ९ हजार २० व मांडकी येथील २ हजार ७८२ व्यक्तींचे घरोघरी सर्वेक्षण करून धडक मोहिम राबविली.
या मोहिमेत नीरा येथील २४ व्यक्ती व मांडकी येथील १ व्यक्तीं कोरोना अहवाल बाधित आढळला. जिल्ह्यातील १०७ गावे कोरोना हॉटस्पॉट ठरल्याने कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला मंगळवारी (दि.१३) व बुधवारी ( दि.१४) या दोन दिवसांत कोरोना बाधित व हॉटस्पॉट गावांमध्ये धडक सर्वेक्षण व नमुना तपासणी मोहिम राबविण्याचे आदेश दिले होते. त्या पार्श्वभुमीवर पुरंदर तालुक्यातील नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील नीरा व मांडकी या गावातही धडक सर्वेक्षण मोहिम राबविण्यात आली.
नीरा येथील सहा प्रभागातील व सुपर स्प्रेडर असलेल्या बाजारपेठेतील दुकानांतील असे १ हजार ८५३ घरांचा सर्वेक्षण करण्यात आला. या सर्वेक्षणांत ९ हजार २० व्यक्तींची आशा स्वयंसेविका यांच्या नऊ टीमने मंगळवारी (दि.१३) व बुधवारी (दि.१४) या दोन दिवसांत सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणांत ११८ व्यक्तींची अँटिजन नमुना तपासणी तर ९३ व्यक्तींची आर.टी.पी.सी.आर. तपासणी करण्यात आली. या तपासणीत २४ व्यक्तींना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे.
मांडकी येथे आशा स्वयंसेविका यांच्या तीन टीम मार्फत ६१० घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणांत २ हजार ७८२ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. या सर्वेक्षणांत २६ व्यक्तींची अँटिजन नमुना तपासणी तर २१ व्यक्तींची आर.टी.पी.सी.आर तपासणी करण्यात आली. या तपासणीत एका व्यक्तीला कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आल्याची माहिती नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुत्रांनी दिली.