Dhananjay Chandrachud: देशाच्या सरन्यायाधीश पदावर पुण्याचे धनंजय चंद्रचूड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 08:42 PM2022-10-12T20:42:48+5:302022-10-12T20:43:07+5:30
धनंजय चंद्रचुड हे माजी सरन्यायाधीश यशवंतराव विष्णू चंद्रचूड यांचे चिरंजीव
शिक्रापूर : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील देशाच्या उच्च पदावर कनेरसर ता. खेड येथील माजी सरन्यायाधीश यशवंतराव चंद्रचूड यांच्यानंतर त्यांचेच चिरंजीव न्यायमुर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड हे पुढील महिन्याच्या ९ तारखेला देशाचे सरन्यायाधीश म्हणून विराजमान होणार आहेत. विद्यमान सरन्यायाधीश उदय उमेश ललित यांनी तशी नुकतीच घोषणा केली.
सरन्यायाधीश ललित ८ नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. केंद्र सरकारच्या वतीने सरकारने ७ ऑक्टोबर रोजी सरन्यायाधीश ललित यांना पत्र लिहून त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची शिफारस करण्याची विनंती केली होती. ज्येष्ठता यादीनुसार, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे विद्यमान सरन्यायाधीश ललित यांच्यानंतर सर्वात ज्येष्ठ आहे. पर्यायाने त्यांच्याच नावाची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे ते देशाचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून विराजमान होण्यासाठी केवळ औपचारीकता बाकी आहे. दरम्यान, यापूर्वी सरन्यायाधीश म्हणून सर्वाधिक काळ म्हणजे तब्बल सलग सात वर्षे आणि ४ महिने एवढा कार्यकाल यशवंतराव चंद्रचूड (सन १९७८ ते सन १९८५) यांना मिळाला होता. कनेरसर, पुणे, मुंबई आणि दिल्ली असा शैक्षणिक प्रवास केलेल्या यशवंतराव यांच्यासारखाच शैक्षणिक प्रवास विद्यमान न्यायमुर्ती धनंजय चंद्रचूड यांचा आहे. चंद्रचूड वाडा म्हणून अजुनही त्यांचा भव्य वाडा कनेरसर व निमगाव (ता.खेड) येथे उभा आहे. येथे काही प्रमाणात शेतीही त्यांच्या कुटुंबीयांकडून केली जाते.कनेरसर येथील यमाई देवी, निमगाव येथील खंडोबा या कुलदैवत-ग्रामदैवतांच्या दर्शनासाठी चंद्रचूड परिवार कुठलाही गाजावाजा न करता येवून जात असल्याची माहिती स्थानिक मंडळी देतात.
न्यायमुर्ती धनंजय चंद्रचुड यांची कौटुंबिक माहिती अन् जीवनप्रवास
धनंजय चंद्रचुड यांचे वडील माजी सरन्यायाधीश यशवंतराव विष्णू चंद्रचूड. आई प्रभा चंद्रचूड या विद्वान शास्त्रीय गायिका. न्यायमुर्ती धनंजय चंद्रचूड यांचे शालेय शिक्षण मुंबईत झाले. त्यानंतर ते नवी दिल्लीतही शिकले. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी गणित आणि अर्थशास्त्र या विषयात पदवी घेतल्यानंतर याच विद्यापीठातून ते एलएलबी झाले. पुढे त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून एलएलएम ही पदवी घेतली. हार्वर्ड विद्यापीठाने न्यायशास्त्र विषयाचा जोसेफ बेले पुरस्कार देऊन त्यांना गौरवले होते. न्यायशास्त्र या विषयात त्यांनी पीएचडी केली असून मुंबई उच्च न्यायालयात वकिली करत असतानाच त्यांनी रिझर्व्ह बँक, ओएनजीसी सारख्या अनेक केंद्रीय आस्थापना, मुंबई विद्यापीठ आदींच्या केसेस उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात लढल्या. मार्च २००० मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. ऑक्टोबर २०१३ मध्ये ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले व अंतीमत: मे २०१६ पासून ते सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून कार्यरत आहेत. नामदेव ढसाळही कनेरसर-पूरचे भूमिपुत्र न्यायमुर्ती धनंजय चंद्रचुड आणि त्यांच्या परिवाराचे निमित्ताने कनेरसर देश पातळीवर चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. येथील आणखी एक प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व, बंडखोर-विद्रोही व 'गोलपिठा'कार साहित्यिक पद्मश्री नामदेव ढसाळ हे सुध्दा कनेरसर-पुर येथील आहेत.