कल्याणीनगरमध्ये मध्यरात्रीपर्यंत ‘धांगडधिंगा’, साऊंड सिस्टीम सुरू ठेवल्याप्रकरणी हाॅटेल मालकांवर गुन्हे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 12:19 IST2024-12-08T12:18:59+5:302024-12-08T12:19:10+5:30
रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू असल्याने तेथील रहिवाशांना त्रास सहन करावा लागतो, याबाबत या भागातील रहिवाशांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या.

कल्याणीनगरमध्ये मध्यरात्रीपर्यंत ‘धांगडधिंगा’, साऊंड सिस्टीम सुरू ठेवल्याप्रकरणी हाॅटेल मालकांवर गुन्हे
पुणे: पोर्शे कार प्रकरण, पब यामुळे सतत चर्चेत असलेल्या कल्याणीनगर भागात पुन्हा मध्यरात्रीपर्यंत हाॅटेल सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिस आयुक्तांचे आदेश धुडकावून हाॅटेलमध्ये मध्यरात्रीपर्यंत साऊंड सिस्टीम सुरू ठेवल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी दोन हाॅटेल मालकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. कल्याणीनगर येथील कुकू हॉटेलचे मालक खुशबू वर्मा, व्यवस्थापक फैयाज फकिराउद्दीन मीर (३२), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिस कर्मचारी प्रवीण खाटमोडे यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कल्याणीनगर येथील हॉटेल कुकू येथे गुरुवारी (दि. ५) मध्यरात्री पोलिसांनी छापा टाकला असता हॉटेलमध्ये बेकायदा साऊंड सिस्टीम सुरू असल्याचे आढळून आले. यावेळी हॉटेलमध्ये ४८ ग्राहक होते. पोलिसांनी हॉटेल मालकासह व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल केला. दुसऱ्या कारवाईत कल्याणीनगर येथीलच हॉटेल ओआयब्रू येथे छापा टाकून कारवाई केली. त्यावेळी या हाॅटेलमध्ये २५ ते ३० ग्राहक होते. मध्यरात्रीपर्यंत हॉटेल सुरू ठेवून साऊंड सिस्टीम सुरू ठेवल्याप्रकरणी हॉटेलचे मालक अमन प्रेम तलरेजा (३०, रा. कोरेगाव पार्क) आणि व्यवस्थापक निखिल बेडेकर (३६, मुंढवा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याणीनगर भागातील ‘हिट अँड रन’ प्रकरणानंतर या भागात मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणारे हॉटेल, पब विरोधात नागरिकांनी तीव्र रोष व्यक्त करत तक्रारी केल्या होत्या. पोलिस प्रशासनाने कारवाई करून २० पेक्षा अधिक पब विरोधात कारवाई केली हाेती. मात्र, त्यानंतर या भागातील हॉटेल, पब पुन्हा मध्यरात्रीपर्यंत सुरू झाल्याचे दिसून आले आहे. रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू असल्याने तेथील रहिवाशांना त्रास सहन करावा लागतो. याबाबत या भागातील रहिवाशांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या.