बंद न पाळता धनगर समाजाचे शांततेत आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 12:51 AM2018-08-14T00:51:29+5:302018-08-14T00:53:03+5:30

धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर लोकांना वेठीस न धरता या प्रश्नावर निर्णय घेण्याची क्षमता आहे. अशा मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ व न्याय व्यवस्थेकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेऊन, इंदापूर तालुका धनगर समाज आरक्षण कृती समितीने सोमवार (दि. १३) रोजीच्या नियोजित ‘महाराष्ट्र बंद’मध्ये इंदापूर तालुका बंद न ठेवण्याचा निर्णय घेतला.

Dhangar community peaceful Movement for reservation | बंद न पाळता धनगर समाजाचे शांततेत आंदोलन

बंद न पाळता धनगर समाजाचे शांततेत आंदोलन

Next

इंदापूर : धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर लोकांना वेठीस न धरता या प्रश्नावर निर्णय घेण्याची क्षमता आहे. अशा मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ व न्याय व्यवस्थेकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेऊन, इंदापूर तालुका धनगर समाज आरक्षण कृती समितीने सोमवार (दि. १३) रोजीच्या नियोजित ‘महाराष्ट्र बंद’मध्ये इंदापूर तालुका बंद न ठेवण्याचा निर्णय घेतला. ‘बंद’ऐवजी शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
परंतु, सतत बंद व आंदोलने यांच्यामुळे नागरिकांना होणार त्रास लक्षात घेता व बाजारपेठेत असलेली मंदी, शेतकऱ्यांची दुष्काळसदृश परिस्थिती, किरकोळ व्यापारी यांचे ‘बंद’मुळे होणारे नुकसान व सणासुदीचा काळ याचा विचार करून आजचा बंद मागे घेण्यात येत आहे; परंतु धनगर आरक्षणाचा लढा शासन दरबारी यापुढे अधिक तीव्रतेने लढण्याचा निर्धार करण्यात येत आहे. तरी सर्व व्यापारी, व्यावसायिक, वाहतूकदार, सामान्य नागरिक यांनी आपले दैनंदिन व्यवहार सुरळीत चालू ठेवावेत, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. यासंदर्भात, तालुका धनगर समाज आरक्षण कृती समितीचे समन्वयक पोपट पवार, महेंद्र रेडके, अमोल भिसे, किरण गोफणे, माऊली वाघमोडे, नानासाहेब खरात, दत्तात्रय पांढरे, अप्पा माने, सचिन सूळ, संपत पुणेकर,भागवत वाघमोडे, सतीश शिंगाडे यांच्या सह्यांनी प्रसिद्धी पत्रक देण्यात आले आहे.

धनगर आरक्षणाच्या संदर्भात राज्यभरात वेगवेगळी आंदोलने करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली होती; पण गेल्या महिनाभरातील आंदोलनांमुळे राज्यातील जनतेला जो त्रास सहन करावा लागला, तो पाहता सामान्य जनतेला वेठीस धरून आरक्षणाची मागणी करण्यापेक्षा ज्यांच्याकडे या प्रश्नावर निर्णय घेण्याची क्षमता आहे, अशा मंत्रिमंडळ व न्याय व्यवस्थेकडे धनगर आरक्षणाबाबत पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला आहे, असे इंदापूर तालुका तालुका धनगर समाज आरक्षण कृती समितीने या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

  भिगवण परिसरातील धनगर समाजाच्या वतीने आंदोलन
भिगवण : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करून त्याची तत्काळ अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी भिगवण परिसरातील धनगर समाजाच्या वतीने येथील मदनवाडी चौफुला (ता. इंदापूर) येथे आंदोलन करण्यात आले. आरक्षणाच्या मागणीसाठी बंदचा मार्ग न स्वीकारता समाजाची भूमिका सनदशीर मार्गाने निवेदनाच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचविण्यात आली. बंद न करण्याच्या धनगर समाजाच्या भूमिकेचे ग्रामस्थांनी स्वागत केले.
धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात यावा या मागणीसाठी भिगवण परिसरातील धनगर समाजाच्या वतीने सोमवारी येथील मदनवाडी चौफुला (ता. इंदापूर) येथे सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात आले. आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज बांधवांनी एकत्र येऊन येळकोट येळकोट जय मल्हार, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, कोण म्हणतंय देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा घोषणा देत आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली.
या वेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, संपत बंडगर, आबासाहेब बंडगर, सतीश शिंगाडे, अरविंद देवकाते, अमित देवकाते, कुंडलिक बंडगर, जिजाराम पोंदकुले, तेजस देवकाते, अण्णा धवडे, सुरेश बिबे व धनगर समाजातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्य घटनेनुसार धनगर समाजाचा समावेश हा अनुसूचित जमातीमध्येच आहे. परंतु धनगड व धनगर असा वाद निर्माण करून धनगर समाजाला मागील सत्तर वर्षे आरक्षणापासून वंचित ठेवल्याची भावना या वेळी समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
समाजाच्या मागण्यांचे निवेदन भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निळकंठ राठोड यांना देण्यात आले. आंदोलनासाठी भिगवण पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे, आरक्षणासाठी आत्महत्या केलेले परमेश्वर घोंगडे यांच्या कुटुंबास २५ लाखांची आर्थिक मदत करावी, धनगर समाजातील विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती तत्काळ अदा करावी, मेंढपाळांना गायरान जमिनी राखीव ठेवाव्यात, पावसाळ्यात वनजमिनीवर मेंढपाळांना चराई कुरणे राखीव ठेवावीत आदी मागण्या करण्यात आल्या.

धनगर समाजाच्या ‘बंद’ला दौैंड तालुक्यात संमिश्र प्रतिसाद

राहू : धनगर समाजाच्या आरक्षण मागणीसाठी राहू ग्रामस्थांनी व व्यापाºयांनी बाजारपेठ बंद ठेवून प्रतिसाद दिला. सकाळी धनगर समाजाचे युवक मोठ्या संख्येने महात्मा फुले चौकात जमा झाले.
आरक्षण अंमलबजावणीची घोषणा देत महात्मा फुले चौक ते महादेव मंदिरादरम्यान मोर्चा काढून शासनाचा निषेध करण्यात आला. नंतर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको करून या वेळी रस्त्यावरच सभेचे आयोजन करण्यात आले. सभेत युवकांनी शासनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. सरकारने गेल्या चार वर्षांत धनगर समाजाची मोठी फसवणूक केली असल्याचा आरोप रासपचे नेते बाळासाहेब गरदरे यांनी केला.
या वेळी तात्यासाहेब तेळे, दत्तोबा डुबे, बाळासाहेब कारंडे, शहाजी डुबे, सागर डुबे यांनी मनोगत व्यक्त केले.

Web Title: Dhangar community peaceful Movement for reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.