धनगरवाडीने कोरोनाला केले वेशीपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:08 AM2021-06-05T04:08:14+5:302021-06-05T04:08:14+5:30
लोकमत न्यूज नेटवटर्क खोडद : एकीकडे संपूर्ण तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असतानाच जुन्नर तालुक्यातील धनगरवाडी गावाने ...
लोकमत न्यूज नेटवटर्क
खोडद : एकीकडे संपूर्ण तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असतानाच जुन्नर तालुक्यातील धनगरवाडी गावाने मागील एक महिन्यापासून गावात एकही नागरिक कोरोना संक्रमित होऊ दिला नाही. यामुळे धनगरवाडी ग्रामस्थांना कोरोनाची ही लाट रोखण्यात यश आले आहे. धनगरवाडी गावचे सरपंच महेश शेळके, उपसरपंच राजेंद्र शेळके व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले. यामुळे धनगरवाडी गावाची वाटचाल कोरोनामुक्तीकडे झाली आहे.
धनगरवाडी गावातील अनेक नागरिक नारायणगाव आणि मुंबईमध्ये स्थायिक आहेत. धनगरवाडी गावची लोकसंख्या २ हजार ३०६ आहे. मागील वर्षभरात गावातील १२२ नागरिकांना करोनाचा संसर्ग झाला होता. यापैकी ११३ रुग्ण बरे झाले आहेत.
ग्रामपंचायत व करोना नियंत्रण समितीने करोनाचे रुग्ण का वाढले, याचे सर्वेक्षण केले. गावामधील प्रत्येक कुटुंबाचे दररोज करून सर्वेक्षण करून त्यामध्ये ऑक्सिजन पातळी, ताप, खोकला, अंगदुखी याबाबत चौकशी करून कोणाला काही प्राथमिक लक्षणे आहेत का हे जाणून घेतले. संशयित रुग्णांची तत्काळ रॅपिड (अॅंंटिजन) टेस्ट, सौम्य लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांचे विलगीकरण करण्यात आले. गावात सोडियम हायपोक्लोराइडची फवारणी, प्रत्येक कुटुंबासाठी सॅनिटायझर, मास्कचे वाटप, कोरोनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने माहितीपत्रके संपूर्ण गावात वाटण्यात आली.
सर्व नागरिकांना आर्सेनिक अल्बम ३०, व्हिटॅमिन, रोगप्रतिकारक, शक्तिवर्धक औषधांचे वाटप करण्यात आले.
नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तरुण सुशिक्षित सरपंच म्हणून महेश शेळके व ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांची पत्नी प्रियांका शेळके हे पती-पत्नी निवडून आले आहेत. तातडीच्या प्रसंगी अनेक रुग्णांना ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, प्लाझ्मा मिळवून देण्यासाठी सरपंच महेश शेळके यांनी प्रयत्न केले आहेत.
कोट
सरपंचपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर गावच्या विकासाचे काम हाती घेतले. मात्र, कोरोनाचा दुसऱ्या लाटेमध्ये सगळे ठप्प झाले. ग्रामविकासाला खीळ बसू नये म्हणून ग्रामपंचायतीच्या सर्व मासिक सभादेखील ऑनलाइन घेण्यात आल्या आहेत. पुढील काळात परिस्थितीनुसार ग्रामसभा देखील ऑनलाईन घेतल्या जातील. गावात कोरोनाचे संक्रमण होऊ नये म्हणून यापुढेही अधिक काळजी घेतली जाईल." - महेश शेळके, सरपंच, धनगरवाडी, ता. जुन्नर
कोट
कोरोनाला अटकाव घालण्यासाठी धनगरवाडी ग्रामपंचायतने केलेली उपाययोजना व घेतलेले परिश्रम कौतुकास्पद आहेत. तालुक्यातील इतर गावांनीदेखील धनगरवाडी गावचा आदर्श घेऊन कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात. यासाठी सरपंच, उपसरपंच व स्थानिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेतल्यास नक्कीच सकारात्मक परिस्थिती दिसून येईल." - डॉ. वर्षा गुंजाळ, वैद्यकीय अधिकारी,
वारूळवाडी, आरोग्य उपकेंद्र
कॅप्शन : धनगरवाडी गावात ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करतेवेळी सरपंच महेश शेळके व इतर पदाधिकारी.