पुण्यात पुन्हा धुमाकूळ: दोघांवर कोयत्याने वार; पळून जाणाऱ्या ९ आरोपींना पाठलाग करत पोलिसांकडून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 11:18 AM2024-09-04T11:18:31+5:302024-09-04T11:19:05+5:30
जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपी कमलेश कांबळे आणि त्याच्या साथीदारांनी फिर्यादी आणि त्याच्या मित्रावर प्राणघातक हल्ला केला.
किरण शिंदे, लोकमत न्यूज नेटवर्क|
पुणे शहरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. किरकोळ कारणावरून खून करण्यापर्यंत आरोपींची मजल वाढली आहे. कोयते काढून दहशत पसरवणे हा तर नित्याचाच भाग झाला आहे. अशातच धनकवडी परिसरातील काळुबाई मंदिराजवळ आठ ते नऊ जणांच्या टोळक्याने दोघांवर कोयत्याने वार केले. त्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या ९ आरोपींना सहकारनगर पोलिसांनी पाठलाग करत ताब्यात घेतले.
मल्लेश पांडुरंग कांबळे (वय ३८), रवी आनंद चव्हाण (वय २०), दत्ता रामचंद्र जाधव (वय २२), सार्थक बाळासाहेब कुडले (वय २०), अक्षय आप्पा मोहिते (वय २४), स्वप्निल गणेश जाधव (वय २०), आणि निरंजन उत्तम देवकर (वय १९) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी समीर अनंता खोपडे यांनी तक्रार दिली आहे. सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपी कमलेश कांबळे आणि त्याच्या साथीदारांनी फिर्यादी आणि त्याच्या मित्रावर प्राणघातक हल्ला केला. आज याला जिवंत सोडायचे नाही असे म्हणून कोयत्याने त्याच्यावर वार केले. त्यानंतर सर्व आरोपी पसार झाले होते. सहकारनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला. दरम्यान पोलीस अंमलदार अमोल पवार आणि महेश मंडलिक यांना आरोपी तीन हत्ती चौकातून धनकवडीच्या दिशेने दुचाकीवरून पळून जात असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानंतर सहकारनगर पोलिसांचे एक पथक त्या ठिकाणी गेले. पोलिसांना पाहताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनीही दुचाकीने पाठलाग करत यातील सर्व आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांनी कोयत्याने फिर्यादीला मारहाण केल्याची कबुली दिली. त्यानंतर या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.