धनकवडी पोलीस चौकी नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 03:12 AM2017-08-03T03:12:14+5:302017-08-03T03:12:14+5:30
शहरात पोलीस चौकीला जागा मागूनदेखील मिळत नाहीत किंवा जागेअभावी दहा बाय दहाच्या रूममध्ये कोणतीही सुविधा नसलेल्या पोलीस चौक्या आहेत,
धनकवडी : शहरात पोलीस चौकीला जागा मागूनदेखील मिळत नाहीत किंवा जागेअभावी दहा बाय दहाच्या रूममध्ये कोणतीही सुविधा नसलेल्या पोलीस चौक्या आहेत, याचीच उलट परिस्थिती धनकवडी येथे शरदचंद्र पवार बहुउद्देशीय भवन येथे धनकवडी पोलीस चौकीसाठी फर्निचरसह अद्ययावत असे सर्व काही तयार आहे, तसेच यासंबंधी १७ जुलै रोजी पोलीस चौकी स्थलांतरित करावी, अशी मागणीचे पत्र पोलीस आयुक्त, सहआयुक्त, उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहकारनगर पोलीस ठाणे यांना दिले असूनदेखील ताबा घेण्यासाठी कोणाचाही फोन अथवा विचारणा झाली नसल्याने या जागेची गरज पोलिसांना आहे
किंवा नाही, असा प्रश्न स्थानिक नगरसेवक विशाल तांबे यांना पडला आहे.
धनकवडीची सध्याची पोलीस चौकीची जागा भाडेतत्त्वावर असून या ठिकाणी अद्ययावत बिल्डिंगसह फर्निचरपण नाही.
नवीन बांधण्यात आलेली चौकी शिवाजी आहेर या मुख्य रस्त्यावरील चौकात मध्यवर्ती ठिकाणी
असल्याने त्याचा फायदा
सर्वसामान्य नागरिकांना होणार असून त्याची दखल मात्र पोलीस घेत नाहीत.
तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांना या जागेत पोलीस चौकीसाठी जागा देण्यासाठी आवाहन केले होते. याच शब्दाला जागून ही फर्निचरसह जागा उपलब्ध करून दिली आहे.
या जागेची गरज नसेल तर शहर पोलीस विभागाने तसे पत्र महापालिका किंवा स्थानिक नगरसेवकांना दिल्यास नागरिकांच्या गरजेच्या दृष्टीने अन्य सोईसुविधा किंवा अन्य विभागाला वर्ग करता येईल, असे स्थानिक नगरसेवक व स्थायी समितीचे माजी
अध्यक्ष विशाल तांबे यांनी
सांगितले.