कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धारेश्वर मंदिर महाशिवरात्रीला राहणार बंद; सर्व कार्यक्रम रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 01:04 PM2021-03-10T13:04:56+5:302021-03-10T13:08:51+5:30
धायरी येथील धारेश्वर महादेव संस्थानच्या विश्वस्तांची माहिती
धायरी: धारेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त आयोजित करण्यात आलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्याचबरोबर कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मंदिरही बंद ठेवण्याचा निर्णय संस्थानच्या विश्वस्त मंडळानी घेतला असल्याचे संस्थानचे अध्यक्ष सोमनाथ रायकर यांनी ही माहिती दिली.
शासनाने तीर्थक्षेत्र म्हणून जाहीर केलेले धायरी येथील श्री धारेश्वर मंदीर हे शिवकालीन असून श्री धारेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त दरवर्षी दर्शनासाठी लाखो भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. मात्र,यंदाच्या वर्षी कोरोनाचे सावट असल्याने महाशिवरात्री निमित्त आयोजित करण्यात आलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
धारेश्वर शिवलिंग हे स्वयंभू आहे. १० मार्च १९९४ रोजी शंकराचार्य विद्याशंकर भारती यांच्या हस्ते कलशारोहण करण्यात आले आहे. त्याचबरोबर धारेश्वर मंदिरामध्ये प्रत्येक वर्षी चैत्र शुद्ध चतुर्थीला उत्सव, माघ पोर्णिमा, भाते तेरस, घुगरे तेरस, त्रिपुरारी पौर्णिमा -दिपोत्सव आदी कार्यक्रमांचे आयोजन धारेश्वर महादेव संस्थानच्या वतीने करण्यात येते.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनाचा भाग म्हणून शासनाच्या आदेशावरून महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. शिवाय मंदिरही बंद ठेवण्यात येणार असल्याने मंदिर परिसरात भक्तांनी गर्दी करू नये.
- देविदास घेवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रस्ता पोलीस ठाणे