ज्येष्ठांच्या वाटेवर धर्मही चालतो
By admin | Published: June 6, 2016 12:24 AM2016-06-06T00:24:21+5:302016-06-06T00:24:21+5:30
पंढरपूरच्या वारीचे महत्त्व शहरी लोकांपेक्षा ग्रामीण भागातील लोकांना अधिक माहिती आहे. ज्येष्ठ नागरिक ज्या वाटेने चालतात त्याच वाटेवर कनिष्ठ लोक व धर्मही चालतो
पुणे : पंढरपूरच्या वारीचे महत्त्व शहरी लोकांपेक्षा ग्रामीण भागातील लोकांना अधिक माहिती आहे. ज्येष्ठ नागरिक ज्या वाटेने चालतात त्याच वाटेवर कनिष्ठ लोक व धर्मही चालतो, असे मत संतसाहित्यिक भारुडकार डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले.
आनंदी ज्येष्ठ नागरिक संघ, कोथरुड सांस्कृतिक मंडळ व देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ, श्रीपाद वल्लभ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित केलेल्या डॉ. देखणे यांच्या एकसष्टीनिमित्त सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार मेधा कुलकर्णी या होत्या.
प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री गिरीश बापट, गिरीजा बापट, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष श्रीराम बेडकिहाळ, श्रीराम कुलकर्णी, नगरसेविका मुक्ता टिळक, विनायक रबडे, दत्तात्रश देशपांडे, किशोर मारणे, अंजली देखणे, सुषमा कुबेर उपस्थित होते.
डॉ. देखणे म्हणाले, लहानपणापासून माझ्या घरातील संस्कारांचा परिणाम माझ्यावर झाला. माझ्या घरातच वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. वडील भारुड गात असल्याने त्यांच्या सातत्य सहवासामुळेच माझे व्यक्तिमत्व घडले.
आमदार कुलकर्णी म्हणाल्या, विरंगुळा केंद्राची मागणी महापालिकेतील सत्ताधारी पूर्ण करू शकले नाहीत. ती मागणी भाजपा पूर्ण करेल. ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६५ वरून ६० करण्यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे.
श्रीपाद वल्लभ प्रतिष्ठानतर्फे २१ ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. गिरीश बापट यांनी आनंदी ज्येष्ठ नागरिक संघास ११ हजार रुपयांची देणगी दिली. ‘प्रज्योत’ मासिकाचे प्रकाशन बापट यांच्या हस्ते करण्यात आले. चारुशीला बेलसरे यांचे याप्रसंगी गायन झाले. उदय रेणूकर यांनी सूत्रसंचलन केले तर श्रीराम कुलकर्णी यांनी आभार मानले. अच्युत कुलकर्णी, श्रद्धा वैद्य, अन्वीकर वसंत देव यांनी सहकार्य केले.