Pune: संजय काकडेंच्या विरोधात धरणे आंदोलन, जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आराेप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 02:38 PM2023-12-29T14:38:08+5:302023-12-29T14:39:06+5:30
ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक युवराज मोहिते यांनी आंदोलकांची भेट घेतली...
पुणे : माजी खासदार संजय काकडे यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदाेलन करण्यात आले. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर गुरुवारी सकाळी हे धरणे आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, काकडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेशच राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाने पोलिसांना दिले असून, त्याची अमलबजावणी होत नाही. काकडे यांच्या मालकीचा भूगावमध्ये मोठा भूखंड आहे. त्याला लागूनच या प्रकरणातील तक्रारदार दिलीप कदम यांचा लहानसा भूखंड आहे. तो ताब्यात घेण्यासाठी काकडे यांच्याकडून त्रास दिला जात आहे. तसेच, जातिवाचक शब्द वापरत धमकी दिली गेली, अशी तक्रार कदम यांनी केली. संजय काकडे यांच्या विरोधात पोलिस तसेच आयोगाकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत आयोगाने पोलिसांना काकडे यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत वंचित बहुजन आघाडीचे शहर उपाध्यक्ष अजय भालशंकर यांनी सांगितले की, पोलिस या प्रकरणात वेळकाढूपणा करत आहेत. त्यामुळेच पोलिसांविरोधात गुरुवारी धरणे आंदोलन केले. यात आघाडीच्या वतीने ॲड. किरण कदम, ॲड. अरविंद तायडे, ॲड. रेखा चौरे तसेच विशाल कसबे, राहुल दहिरे, अनिता शिंदे, राजश्री तुपे आदी उपस्थित होते. काकडे यांच्या निषेधार्थ घोषणा देण्याबरोबर आयोगाच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणी करणारे निवेदन देण्यात आले.
आश्वासनानंतर आंदाेलन मागे :
ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक युवराज मोहिते यांनी आंदोलकांची भेट घेतली. तुमच्या मागण्या व निवेदन वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. येत्या ८ दिवसांत याची दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भालशंकर यांनी दिला. त्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले.