‘त्यांच्या’ संशोधनामुळे महाराष्ट्राच्या दुर्गवैभवात ‘ढवळगडा’ची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 08:04 PM2018-05-19T20:04:50+5:302018-05-19T21:02:54+5:30
आजही महाराष्ट्रात कितीतरी किल्ले असे आहेत जे अद्यापही अप्रकाशात आहेत. अशाच एका विस्मृतीत गेलेल्या किल्ल्याची स्थाननिश्चिती करण्यात पुण्यातील गिर्यारोहकाला यश आले आहे.
पुणे: महाराष्ट्राला लाभलेल्या दुर्गवैभवाची ख्याती जगप्रसिद्ध आहे. या दुर्गवैभवाला अभिमान व पराक्रमाची एक ऋणानुबंधाची झालर आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या कुशीत दूरवर विखुरलेली ही दुर्गसंस्कृती गिर्यारोहकांसह पर्यटकांना वारंवार खुणावत असते. मात्र, आजही महाराष्ट्रात कितीतरी किल्ले असे आहेत जे अद्यापही अप्रकाशात आहेत. अशाच एका विस्मृतीत गेलेल्या किल्ल्याची स्थाननिश्चिती करण्यात पुण्यातील एका गिर्यारोहकाला यश आले आहे. ओंकार ओक असे या गिर्यारोहकाचे नाव आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या दुर्गवैभवात आणखी एका किल्ल्याची भर पडली आहे. पुरंदर तालुक्यातील आंबळे गावाजवळ हा ढवळगड वसलेला असून, गडावरील ढवळेश्वर मंदिर स्थानिक ग्रामस्थांमध्ये सुप्रसिद्ध आहे. गडावर जाण्यासाठी २ मार्ग असून त्यातला पहिला मार्ग सासवडहुन - वनपुरी - सिंगापूर- पारगाव चौफुला- वाघापूर- आंबळे असा आहे. तर आंबळे गावातून गडाच्या अर्ध्यावर जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. दुसरा मार्ग पुणे - सोलापूर मार्गावरील उरुळीकांचन येथून असून डाळिंब गावमार्गे चालत तासाभरात गडाचा माथा गाठता येतो. इतिहास संशोधक कृष्णाजी वामन पुरंदरे यांच्या किल्ले पुरंदर या अस्सल संदर्भपुस्तकात ढवळगडचा उल्लेख आलेला आहे. त्याचे स्थान भुलेश्वर डोंगररांगेत असल्याचे नमूद केले आहे. स्थानिक गावकºयांना हा ढवळगड माहित आहे. मात्र, त्याच्यावर किल्ला या दृष्टिकोनातून शास्त्रशुद्ध संशोधन न झाल्यामुळे ढवळगड अप्रकाशितच राहिला. त्यामुळे गिर्यार्रोहक किल्ल्याबाबत अद्याप अनभिज्ञच होते. या ढवळगडच्या स्थान निश्चितीबद्दल सांगताना ओक म्हणाले, फेब्रुवारी महिन्यात काही मित्रांबरोबर आंबळे गावाच्या परिसरात पक्षीनिरीक्षणासाठी गेलो होतो तेव्हा एका डोंगरावर तटबंदी आढळून आली. त्यामुळे उत्सुकता वाढली त्या ठिकाणी जाऊन अधिक शोध घेतला असता तटबंदी, भग्न दरवाजा, पाण्याची खोदीव टाकी,मंदिर, बुरुज, चुन्याच्या घाण्याचे अवशेष,मेटाची ठिकाणे इत्यादी अवशेष आढळून आले. पुरंदरे यांच्या पुस्तकातील उल्लेख व ढवळगडाचे स्थान तंतोतंत जुळत असल्याने तसेच गॅझेटीयरमध्येही या किल्ल्याचा कुठेही उल्लेख न आल्याने अधिक खोलात शोध घेण्याचा प्रयत्न केला. या कार्यात ओक यांना पुण्यातील डॉ. सचिन जोशी या इतिहास अभ्यासकाचे बहुमोल योगदान लाभले आहे. याचप्रकारे यापूर्वी म्हणजे २०१२ मध्ये हेमंत पोखरणकर आणि राजन महाजन यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील लोंजा या किल्याची स्थाननिश्चिती केली होती. ओक व डॉ. जोशी यांनी शनिवारी (१९ मे) रोजी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या पाक्षिक सभेत हा संशोधन पेपर सादर केला.
..................
पुण्यात आल्यावर डॉ. सचिन जोशी यांची भेट घेऊन याबद्दल सांगितले तेव्हा जोशी यांनीही या शोधमोहिमेत सहभागी होत पुरातत्वीय दृष्टिकोनातून ढवळगडाचा शोध घेण्याचे ठरवले. आम्ही दोघांनी पुन्हा एकदा या किल्ल्यास भेट देऊन व सर्व उपलब्ध अवशेषांची मोजमापे घेऊन तसेच त्यांची शास्त्रशुद्ध रेखाटने बनवली. किल्ल्यावर आजमितीस तटबंदी, बुरुज, मंदिर, पाण्याची खोदीव व खांबटाकी, मेटाचे अवशेष, चुन्याच्या घाण्याचे अवशेष इत्याही ऐतिहासिक अवशेष असून किल्ला या दृष्टिकोनातून आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी इथे आढळून आल्या. त्यामुळे ढवळगड हाच ऐतिहासिक कागदपत्रात उल्लेख असलेला किल्ला असल्याचे सिद्ध होऊन त्याची स्थाननिश्चिती करण्यात आली. - ओंकार ओक