फार्महाऊसवर तरुणाईचा धिंगाणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:10 AM2021-05-30T04:10:37+5:302021-05-30T04:10:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नसरापूर : पुणे-सातारा मार्गावर केळवडे (ता. भोर) येथील एका फार्महाऊसवर तरुणाईचा डान्स करीत पैशाची उधळण करताना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नसरापूर : पुणे-सातारा मार्गावर केळवडे (ता. भोर) येथील एका फार्महाऊसवर तरुणाईचा डान्स करीत पैशाची उधळण करताना राजगड पोलिसांनी छापा टाकून तेरा जणांना अटक केली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुध्द कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे व उपाययोजनांचा भंग केला म्हणून गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: केळवडे येथे गाऊडदरा येथील सुमित प्रकाश साप्ते यांच्या मालकीच्या फार्म हाऊसवर डान्स चालू असून पैशाची उधळण सुरू आहे अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यांनी ही माहिती राजगड पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी दुपारी सव्वा दोन वाजता या फार्महाऊसवर छापा टाकून तेरा जणांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये सागर रमेश जाधव (वय ३२, रा. खडकवासला), सुनील निवृत्ती पाठक (वय ३३, रा.धनकवडी), विकी वसंत शेलार (वय २५ रा. केळवडे), गणेश विजय कदम (वय ३३, रा.पद्मावती), अविनाश संजय साखरकर (वय २४, विश्रांतवाडी), विशाल गणेश पासलकर (वय ३८, रा.आंबेगाव पठार), सचिन लक्ष्मण शिंदे (वय ३७, रा. धनकवडी ) या मुलांसह पाच मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली राजगड पोलिस ठाण्याचे फौजदार श्रीकांत जोशी, हवालदार एस. एन. कालेकर, एम. व्ही. गायकवाड, एस. आर. कुतवळ, अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.