२७ वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणारा धोबी जेरबंद; आजोबा झाल्यावर लागला पोलिसांच्या हाती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 11:39 AM2021-01-13T11:39:17+5:302021-01-13T11:39:57+5:30
मुळच्या उत्तर प्रदेशमधील एका तरुणाने २७ वर्षापूर्वी किष्किंधानगर येथील एका तरुणीला पळवून नेऊन लग्न केले होते.
पुणे : गेली २७ वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा व न्यायालयाने फरार घोषित केलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विराेधी पथकाने मुंबईच्या कांदिवली परिसरातून अटक केली. मुळच्या उत्तर प्रदेशमधील एका तरुणाने २७ वर्षापूर्वी किष्किंधानगर येथील एका तरुणीला पळवून नेऊन लग्न केले होते. आपल्या मुलीला पळवून नेले असल्याची फिर्याद तिच्या आईवडिलांनी दिली होती. काही दिवसांनी मुलगी परत आली. तेव्हा मुलीच्या अपहरणाची तक्रार १९९३ मध्ये कोथरुड पोलिसांकडे देण्यात आली होती. पुढे आईवडिलांच्या परवानगीने या तरुणाने त्या मुलीशी लग्न केले होते. मात्र, ही गोष्ट पोलिसांपर्यंत आलीच नाही. पोलिसांच्या लेखी हा तरुण फरारी होता. न्यायालयाने त्याला फरारी घोषित केले होते.
दरम्यान गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी धनंजय ताजणे व मॅगी जाधव यांना धोबी हा ओम साईनाथ चाळ कांदीवली वेस्ट मुंबई येथील परिसरात स्वतःचे अस्तित्व लपवून राहत असल्याची माहिती बातमीदारामार्फत मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून धोबीला ताब्यात घेतले. तो मुंबईत खासगी सुरक्षा रक्षकाचे काम करत होता.
ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जुबेर मुजावर, सहायक फौजदार शाहीद शेख, कर्मचारी राहुल निगडे, गणेश पाटोळे यांच्या पथकाने केली. आता तो ५० वर्षाचा असून त्याला मुलेही झाली. त्यांची लग्ने होऊन तो आता आजोबाही झाला आहे. दरोडा व वाहनचोरी पथकाने त्याला कोथरुड पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याची चौकशी केल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. मात्र, हा गुन्हा अद्यापही प्रलंबित असल्याने पोलिसांनी त्याला अटक करुन आज न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली.