आव्वाज कुणाचा? ढोलताशा पथकांचा..!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 01:35 PM2019-08-22T13:35:52+5:302019-08-22T13:36:52+5:30
गणेशोत्सव हा पुण्याचा मानबिंदू! ढोलताशाच्या गजरात होणारे बाप्पाचे आगमन हा अभूतपूर्व सोहळा असतो...
पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवे ताल आणि वादनातील वैविध्यासह ढोलताशा पथके सज्ज झाली आहेत. महिनाभरापासून शहराच्या विविध भागांमध्ये सुरू असलेला सराव अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. तालाचा लयबद्ध आविष्कार पुणेकरांना अनुभवता यावा आणि गणेशोत्सव आगळ्या पद्धतीने अनुभवता यावा, यासाठी पथकांची तयारी सुरू आहे.
गणेशोत्सव हा पुण्याचा मानबिंदू! ढोलताशाच्या गजरात होणारे बाप्पाचे आगमन हा अभूतपूर्व सोहळा असतो. हा सोहळा अधिकाधिक देखणा करण्यासाठी ढोलताशा पथकांनी कंबर कसली आहे. शिस्त आणि तालबद्ध मिरवणुकीसाठी गणेश मंडळांची कायम ढोलताशा पथकांना पसंती असते. डीजेच्या दणदणाटात ढोलताशाचे लयबद्ध नादमाधुर्य सुखावह वाटते. गणरायाच्या आगमनासाठी ढोलताशा पथके गेल्या दीड-दोन महिन्यांपासून तयारीला लागली आहेत. नदीपात्र, म्हात्रे पूल, विविध शाळांची मैदाने अशा विविध ठिकाणांहून सध्या ढोलताशांचा आवाज नागरिकांच्या कानावर पडत आहे.
ढोलताशा पथकात माहिती तंत्रज्ञान आणि इतर व्यवसायात कार्यरत असणारे युवकदेखील उत्साहाने सामील होत आहेत. तीन-चार वर्षांपासून हे प्रमाण वाढले आहे. स्वत:च्या परंपरा आणि उत्साहाच्या वातावरणात सहभागी होण्याची ओढ असल्याकारणाने ही मंडळी पथकांकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे शहरातील पथकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यात गणेशोत्सव काळात पथकांना साधारणपणे २ ते १० लाख रुपयांपर्यंत मानधन मिळते. दहा दिवसांच्या काळात साधारणपणे १० कोटींची उलाढाल होते. ढोलताशा महासंघाच्या मार्गदर्शनाखाली ढोलताशा पथकांची बैठकही नुकतीच पार पडली. पोलीस प्रशासनाबरोबरही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली. पोलिसांनी तयार केलेल्या आचारसंहितेनुसार नियमावली तयार करण्यात आली आहे. या वेळी पोलिसांनी पथकांकडून सर्व वादकांची संगणकीकृत माहिती मागवली असून, पोलिसांकडून त्यांना ओळखपत्रे दिली जाणार आहेत.
ब्रह्मचैतन्य पथकातर्फे यंदा दोन नवीन ताल वादनामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. दीड-दोन मिनिटांचे हे बफर ताल असून, बरची नृत्याचाही समावेश असेल. पुण्यातील गणेशोत्सव पार पडल्यानंतर हे पथक वादनासाठी हैदराबादला रवाना होते.