पुण्यातील ढोल-ताशा पथकाला हैदराबादमध्ये ठेवले होते डांबून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:13 AM2021-09-26T04:13:07+5:302021-09-26T04:13:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : चार दिवसांच्या वादनासाठी सुपारी घेऊन गेलेल्या पुण्यातील स्वामी ओम प्रतिष्ठानच्या ६० जणांच्या पथकाला हैदराबाद ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : चार दिवसांच्या वादनासाठी सुपारी घेऊन गेलेल्या पुण्यातील स्वामी ओम प्रतिष्ठानच्या ६० जणांच्या पथकाला हैदराबाद येथे डांबून ठेवण्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रयत्नांनंतर शनिवारी दुपारी पोलिसांच्या मदतीने या पथकाची सुटका झाली. सायंकाळी ते पुण्याकडे निघाले आहेत.
याबाबत स्वामी ओम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शुभंकर वायचळ यांनी सांगितले की, एका इव्हेंट कंपनीच्या प्रेमानंद यादव यांनी सिकंदराबाद परिसरात ढोल-ताशा वादनाची ४ लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्यानुसार आम्ही १६ मुलींसह ६० जणांचे पथक घेऊन १५ सप्टेंबर रोजी पुण्यातून निघालो. १६ सप्टेंबर रोजी तेथे पोहोचलो. हैदराबाद, सिकंदराबाद येथे १६, १७, १८ व १९ सप्टेंबर रोजी वेगवेगळ्या छोट्या-मोठ्या गावांमध्ये गणपतीसमोर वादन केले. त्यानंतर त्यांनी आणखी ३ दिवस वादन करण्याची गळ घातली. त्यानुसार आम्ही आणखी तीन दिवस वेगवेगळया ठिकाणी वादन केले. आपल्याकडे गणपती उत्सव १० दिवस असतो. तिकडे १५ दिवस साजरा केला जातो. २२ सप्टेंबर रोजी वादन केल्यानंतर आम्ही २३ सप्टेंबरला परत पुण्यात येण्यास निघाल्यावर यादव व इतरांनी मला व प्रणव यांना जेवायला घेऊन गेले. जेवण झाल्यावर त्यांनी परत कसे जाणार असे विचारून आमच्या गाडीच्या चालकाकडून परमिटची फाईल घेतली. त्यानंतर त्यांनी आपला खरा चेहरा दाखवत आणखी तीन दिवस वादन करा. त्याशिवाय सोडणार नाही, असे म्हणाले. आमच्याबरोबरच्या मुलींनाही त्यांनी शिवीगाळ केली. शुक्रवारी रात्री त्यांच्याबरोबर भांडणे झाली. तरी ते सोडायला तयार नव्हते. शेवटी पुण्यातील मनसेच्या कार्यकर्त्या रुपाली ठोंबरे, तसेच नितीन परदेशी यांच्यासह अनेकांना संपर्क केला. हैदराबाद येथील नगरसेविका पुजारी यांच्याशी संपर्क झाला. त्यांनी मदत करून पोलीस उपायुक्तांच्या कानावर ही बाब घातली. हैदराबाद पोलिसांनी आम्हाला मदत केली. त्यांच्याकडून २ लाख रुपये मिळवून दिले. त्यानंतर शनिवारी सायंकाळी आम्ही पुण्याकडे निघालो.
याबाबत रुपाली ठोंबरे यांनी सांगितले की, शनिवारी दुपारी या ढोल पथकाची माहिती मिळाली. त्यानंतर काही वेळातच हैदराबाद येथील राजाभाऊ ठाकूर यांना कळविले. त्यांनी व इतरांनी केलेल्या प्रयत्नानंतर काही तासात या मुलांची पोलिसांनी सुटका करून त्यांना पुण्याकडे रवाना केले आहे.
.....
पुण्यातील आणखी ढोल पथकाला होते निमंत्रण
स्वामी ओम प्रतिष्ठानसह पुण्यातील आणखी काही ढोल-ताशा पथकांना निमंत्रण देण्यात आले होते, अशी माहिती समजते. मात्र, त्यातील काहीजणांनी आगाऊ रक्कम दिली तरच येऊ असे सांगितल्याने ते गेले नाहीत.