वाहतूक जनजागृतीसाठी ढोल-ताशा वादक रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 03:37 AM2017-08-02T03:37:47+5:302017-08-02T03:37:47+5:30
‘गणपती बाप्पा मोरया, वाहतूक नियमांचे पालन करू या... लाल रंग दिसल्यावर बैल उधळतात, माणसं नाही, तेव्हा सिग्नल तोडू नका...’ अशा घोषणा देत पुण्यातील ढोल-ताशा पथकातील तरुणाईने रस्ता सुरक्षा अभियान राबविले.
पुणे : ‘गणपती बाप्पा मोरया, वाहतूक नियमांचे पालन करू या... लाल रंग दिसल्यावर बैल उधळतात, माणसं नाही, तेव्हा सिग्नल तोडू नका...’ अशा घोषणा देत पुण्यातील ढोल-ताशा पथकातील तरुणाईने रस्ता सुरक्षा अभियान राबविले. सिग्नलवर उभ्या असलेल्या वाहनचालकांना सुरक्षा राखी बांधून जनजागृती करण्यासाठी ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांची कन्या वंदना ढवळे आणि महापौर मुक्ता टिळक याही युवा वादकांच्या फौजेसोबत रस्त्यावर उतरल्या.
ढोल-ताशा महासंघ महाराष्ट्र च्या वतीने कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप चौकात या रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ तेंडुलकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाला. या वेळी अॅड. प्रताप परदेशी, आनंद सराफ, शिरीष मोहिते, डॉ. मिलिंद भोई, इक्बाल दरबार, प्रणव पवार, महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाहतुकीचे नियम पाळू, अशी शपथ या वेळी वादकांनी घेतली.
वंदना ढवळे म्हणाल्या, ‘गाडी चालवताना हातातले किंवा पायातले ब्रेक वापरण्याऐवजी डोक्यातील ब्रेक अवश्य वापरायला हवे, असे बाबा नेहमी म्हणत. त्यामुळे आज ढोल-ताशा वादकांनी हा पाच दिवसांचा उपक्रम राबवून बाबांना वेगळ्या प्रकारे आदरांजली अर्पण केली आहे. बाबांनी सुरू केलेल्या वाहतूक जनजागृतीचे कार्य यापुढेही सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.’
पराग ठाकूर म्हणाले, की ढोल-ताशा महासंघातर्फे पुण्यातील तब्बल ८० पथके या अभियानात सहभागी झाली आहेत. यामध्ये शनिवार, ५ आॅगस्टपर्यंत शहर व उपनगरांतील वेगवेगळ्या ८० चौकांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी वाहतूक जनजागृती करण्यात येईल. यामध्ये जनजागृतीपर फलकांसह सुरक्षा राखी बांधून
वाहन चालकांना माहितीपर पत्रके देण्यात येणार आहेत. पुण्यातील तब्बल ५ हजार युवा ढोल-ताशा वादक या अभियानात सहभागी
होणार असून, हीच तेंडुलकर यांना
खरी आदरांजली असेल, असेही
ते म्हणाले.