ढोल ताशा पथकांना सरावासाठी जास्त दिवस मिळतील : मुक्ता टिळक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 07:14 PM2018-07-25T19:14:55+5:302018-07-25T19:22:55+5:30
आजूबाजूच्या नागरिकांना वादनाचा त्रास होऊ नये याची काळजी घेण्यासाठी पथकांनी आचारसंहितेचे पालन करावे. यामुळे नियमांचे उल्लंघन न होता उत्साहाने एकत्रितपणे गणेशोत्सव साजरा करता येईल.
पुणे : लोककल्याणासाठी आणि नागरिकांनी एकत्र यावे यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला. त्याच उत्सवातील ढोल पथकांनी नवी ओळख मिळविली. तसेच या उत्सवाचे बदलते स्वरुप साता समुद्रापार नेले. या ढोल-ताशांच्या पूजनाने उत्सवाचे पडघम सुरु झाले आहेत. नदीच्या कडेला पथकांचे मंडप घालायला सुरुवात झाली आहे. परंतु, आजूबाजूच्या नागरिकांना वादनाचा त्रास होऊ नये याची काळजी घेण्यासाठी पथकांनी आचारसंहितेचे पालन करावे. यामुळे नियमांचे उल्लंघन न होता उत्साहाने एकत्रितपणे गणेशोत्सव साजरा करता येईल. यावर्षी पथकांना जास्तीत जास्त दिवस सरावासाठी मिळतील असा प्रयत्न करु, असे आश्वासन महापौर मुक्ता टिळक यांनी दिले.
ढोल-ताशा महासंघ महाराष्ट्रतर्फे केसरी वाडयात वाद्यपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी तांबडी जोगेश्वरी मंडळाचे प्रसाद कुलकर्णी, तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर, रोहित टिळक, अॅड.प्रताप परदेशी, डॉ.मिलींद भोई, शेखर देडगावकर, शिरीष मोहिते, महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, संजय सातपुते, शिरीष थिटे, अनुप साठये यांसह विविध पथकांचे प्रमुख व वादक उपस्थित होते.
मुक्ता टिळक म्हणाल्या, ‘ढोलताशा पथकांच्या वादनामुळे विसर्जन मिरवणुकीला उशीर होतो, अशी तक्रार येते. त्यामुळे पथकांनी आचारसंहिता ठरवून एका चौकात १५ मिनिटे वादन करुन पुढे मार्गस्थ व्हावे. जेणेकरुन रात्रीच्या लायटिंगचे देखावे असणा-या मंडळांना मिरवणुकीत वेळेत सहभागी होता येईल. ढोल-ताशा महासंघ व पथकांकरीता कोणतीही मदत लागल्यास महापालिका व महापौर म्हणून आम्ही सदैव हजर आहोत.’
अॅड.प्रताप परदेशी म्हणाले, ‘पुढील आठवडयात पोलीस प्रशासनासोबत बैठक होणार असून पथकांनी परवानगी घेतल्यानंतर वादनाच्या सरावाला सुरुवात करावी. अजूनही अनेक जणांवर मागील वर्षीचे खटले सुरु आहेत. आपण सर्व परवानग्या मिळवू मात्र पथकांनी घाई करु नये.’
पराग ठाकूर म्हणाले, ‘ढोल-ताशा महासंघ केवळ पुण्यापुरताच मर्यादित राहिलेला नाही. महाराष्ट्रातील अनेक शहरांमधून पथकांची नोंदणी होत आहे. ढोल-ताशांसोबत नवनवीन वाद्ये अंतर्भूत करण्याचा प्रयत्न पथकांनी करायला हवा. पथकांच्या सरावाच्या परवानगीसाठी अडचणी येऊ नये, यासाठी प्रयत्न सुरु आहेत.’ संजय सातपुते यांनी सूत्रसंचालन केले.