भोर-कापूरव्होळ मार्ग निसरडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 03:09 AM2018-07-28T03:09:41+5:302018-07-28T03:09:59+5:30
रस्ता निसरडा झाल्याने शुक्रवारी जवळपास ७ ते ८ दुचाकी अपघातग्रस्त
भोर : भोर-कापूरव्होळ मार्गावर ग्रामपंचायती डिजिटल करण्यासाठी शासनाकडून आॅप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी रस्त्यांच्या साईडपट्ट्या उकरून माती रस्त्यावर टाकण्यात आली होती. हे खड्डे बुजविल्यानंतर माती रस्त्यावरच राहिली असून पावसाच्या पाण्यामुळे रस्ता निसरडा झाल्याने शुक्रवारी जवळपास ७ ते ८ दुचाकी घसरून त्यांचा अपघात झाले. काही ठिकाणी तोडलेली झाडे रस्त्यावरच टाकण्यात आली आहेत. तर, रस्त्याच्या बाजूंची गटारेही खराब झाल्यामुळे खोदण्यात आलेल्या चारीत गाड्या अडकून पडल्या आहेत. कामाची मुदत गेल्या वर्षी पावसाळ्यात संपली असून दुसरा पावसाळा सुरू होऊन काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.
२०१७ पासून भोर तालुक्यातील ग्रामपंचायती डिजीटल करण्यासाठी भारत दूरसंचार निगम लिमिटेड (टेलिफोन)मार्फत काम सुरू आहे. यामुळे ग्रामंचायतीत वीजबिल, विविध प्रकारचे दाखले, फोन बिल व ग्रामपंचायती अद्ययावत होणार आहेत. या कामासाठी रस्त्याशेजारील जमिनीत सुमारे ५ फूट खोल खड्डा खणून त्यात पाईप व नंतर आॅप्टिकल वायर टाकली जात आहे. मात्र, अनेक ठिकाणी फक्त पाईपच गाडला असून वायर टाकण्यासाठी अर्धा किलोमीटरवर खड्डे ठेवले आहेत. यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. मातीमुळे साईटपट्ट्या व गटारे बुजली आहेत. काही ठिकाणी मार्गात येणारी झाडे तोडलेली असून खड्डे चांगल्या पद्धतीने बजुवले जात नाहीत. जमिनीत खड्डा काढताना तो पाच फूट काढला जात नसून मागील वर्षापासून हे काम रेंगाळले आहे. सन २०१७ पर्यंतच हे काम पूर्ण करण्याची मुदत होती; मात्र मागचा पावसाळा संपून दुसरा पावसाळा आला तरी ही कामे प्रलंबित आहेत. .