टोळक्यांचा महंमदवाडीत धुडगूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:12 AM2021-02-14T04:12:15+5:302021-02-14T04:12:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात गुंडांकडून दहशत निर्माण करण्यासाठी नागरिकांच्या रस्त्याच्या कडेला लावलेल्या वाहनांना लक्ष्य करण्याच्या घटना वारंवार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात गुंडांकडून दहशत निर्माण करण्यासाठी नागरिकांच्या रस्त्याच्या कडेला लावलेल्या वाहनांना लक्ष्य करण्याच्या घटना वारंवार घडत आहे. रेकाॅर्डवरील गुन्हेगार गिरीश हिवाळे याच्यासह त्याच्या टोळीवर मोक्का कारवाई केल्याने त्याच्या समर्थकांनी मध्यरात्री महंमदवाडी रोडवरील तरवडे वस्तीत कोयत्याने नागरिकांना धमकावत ९ वाहनांची तोडफोड केली. तरवडे वस्तीतील साठेनगर येथील गल्ली नंबर ६ जवळील समाज मंदिर परिसरात ही घटना घडली.
याप्रकरणी संतोष नामदेव लोंढे (वय ३८, रा. साठेनगर, तरवडे वस्ती) यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
वानवडी पोलिसांनी सनी हिवाळे याच्या टोळीवर मोक्का कारवाई केली. हे समजताच त्याचे समर्थक मध्यरात्री तरवडे वस्ती परिसरात जमले. या टोळक्याने कार, ४ रिक्षा, २ दुचाकी व दोन टेम्पोंची ताेडफोड केली. हा टोळक्याचा आरडाओरडा ऐकून नागरिक घराबाहेर आल्यावर त्यांनी हत्याराचा धाक दाखवून लोकांना घरात जाण्यात भाग पाडले. ‘तुम्ही घरात गेला नाही तर तुम्हालाही पाहून घेऊ’, अशी धमकी देत शिवीगाळ केली. घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेऊन सात ते आठ जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मार्केट यार्ड परिसरात २८ जानेवारी रोजी एका टोळक्याने २५ ते ३० वाहनांची तोडफोड करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला होता. या परिसराचा आपणच भाई आहोत, हे दर्शविण्यासाठी गुंडांच्या छोट्या-मोठ्या टोळ्यांकडून नागरिकांच्या पार्क केलेल्या वाहनांना लक्ष्य करण्यात येत आहे.
.......
दीड महिन्यात ११ घटना
शहरातील विविध भागात गुंडांकडून लोकांच्या वाहनांना लक्ष्य केले जात असून गेल्या दीड महिन्यात अशा ११ घटना समोर आल्या आहेत. त्यात पोलिसांनी आतापर्यंत ५० जणांना अटक केली आहे.