डायलिसीसच्या रुग्णाला डायबिटीसचे औषध
By admin | Published: September 3, 2016 03:19 AM2016-09-03T03:19:32+5:302016-09-03T03:19:32+5:30
मूत्रपिंडचा त्रास असलेल्या रेल्वे अधिकाऱ्याला उपचारांदरम्यान भलत्याच रुग्णाचे डायबिटीसचे औषध देण्यात आल्याचा प्रकार बुधराणी रुग्णालयात घडला. यामध्ये रेल्वे अधिकाऱ्याचा
पुणे : मूत्रपिंडचा त्रास असलेल्या रेल्वे अधिकाऱ्याला उपचारांदरम्यान भलत्याच रुग्णाचे डायबिटीसचे औषध देण्यात आल्याचा प्रकार बुधराणी रुग्णालयात घडला. यामध्ये रेल्वे अधिकाऱ्याचा मृत्यू झाला असून, कोरेगाव पार्क पोलिसांनी रुग्णालयाचा व्यवस्थापक, डॉक्टर आणि दोन परिचारिकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
चंद्रकांत दिनकर वाळके (वय ५४) असे मृत अधिकाऱ्याचे नाव आहे. बुधराणी रुग्णालयाच्या व्यवस्थापकासह डॉक्टर सचिन पाटील, परिचारिका शारदा डुंबरे, माधवी चक्रनारायण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ज्योती चंद्रकांत वाळके (वय २३, रा. फ्लेमिंगा अपार्टमेंट, बावधन) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळके रेल्वेमध्ये अधिकारी आहेत. त्यांना मूत्रपिंड आणि डायलिसीसचा त्रास होता. त्यामुळे काही वर्षांपासून ते बुधराणी रुग्णालयात उपचार घेत होते. २७ जुलैपासून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. काही दिवसांनी त्यांना घरी सोडण्यात आले, त्या वेळी औषधे लिहून दिली. (प्रतिनिधी)
डॉक्टरांना दाखवून घेतली होती औषधे
घरी घेण्यासाठी काही औषधांची यादी देऊन मेडिकलमधून ही औषधे आणण्यास सांगण्यात आले. वाळके कुटुंबीयांनी ही औषधे आणल्यावर ती डॉक्टर सचिन पाटील यांना दाखविली. औषधे योग्य असल्याचे पाटील यांनी सांगितल्यावर वाळके यांना घरी गेल्यावर ही औषधे देण्यात आली.
औषधांचे सेवन केल्यावर बेशुद्ध पडलेल्या वाळकेंना रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारांदरम्यान त्यांचा शनिवारी मृत्यू झाला. कुटुंबीयांनी रुग्णालयात चौकशी केल्यावर चंद्रप्रकाश लोखंडे या डायबिटीसच्या रुग्णाची औषधे वाळके यांना देण्यात आल्याचे समोर आले. पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये हा प्रकार खरा असल्याचे समोर आल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक जगन्नाथ मोरे पुढील तपास करीत आहेत.