वेळीच म्युकरमायकोसिसचे निदान झाल्यास वाचेल रुग्णाचा प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:10 AM2021-05-11T04:10:18+5:302021-05-11T04:10:18+5:30
आज जागतिक पातळीवर आरोग्य व्यवस्थेवर कोरोना संसर्गाचा ताण असताना, भारतासारख्या विकसनशील देशात म्युकरमायकोसिस, काळी बुरशीच्या आजाराने थैमान घालण्यास सुरुवात ...
आज जागतिक पातळीवर आरोग्य व्यवस्थेवर कोरोना संसर्गाचा ताण असताना, भारतासारख्या विकसनशील देशात म्युकरमायकोसिस, काळी बुरशीच्या आजाराने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. म्युकरमायकोसिसचा आजार हा एक बुरशीचा आजार आहे. कोरोनाग्रस्त रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी होत असते. कोरोना संसर्ग बरा करण्यासाठी स्टिराॅइड्सचा वापर करावा लागतो. ज्या रुग्णांना मधुमेहासारखा आजार आहे, त्यांना काळ्या बुरशीचा आजार होण्याचा धोका जास्त आहे. अचानक दात हलण्यास सुरुवात होणे, दात दुखणे, डोळ्यांवर सुज येणे, पाणी येणे, दातामधून पू येणे, नाकातून पू येणे, दृष्टी कमी होणे, नाकाजवळील गालावरच्या भागावर सुज येणे
अशी बरीच ह्या आजाराची लक्षणे आहेत.
कोरोना संसर्ग होऊन एक महिन्यामध्येच काळ्या बुरशीचा आजार झालेली एक महिला हर्डिकर हाॅस्पिटल येथे दाखल झाली. तोंडाचा एक्सरे, स्कॅन, दाताची तपासणी करण्यात आली व रुग्णाला काळ्या बुरशीचा आजार असल्याचे स्पष्ट झाले. रुग्णालयात रुग्णावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. डाॅ. लक्ष्मण माळकुंजे (एम.डी.एस, ओरल सर्जन) व त्यांना मदतनीस म्हणून डाॅ. प्रतीक यांनी शस्त्रक्रिया केली.
डाॅ. सचिन नागापूरकर यांनीही यामध्ये जातीने लक्ष दिले. लवकर निदान, अचूक उपचार केले तर आजार बरा होऊ शकतो. परंतु, निदान व उपचार यामध्ये विलंब झाला तर रुग्णाला डोळा गमवावा लागू शकतो, हा संसर्ग मेंदूत गेला तर मृत्यूसुद्धा होऊ शकतो. कोरोना संसर्ग झालेल्या व होऊन गेलेल्या रुग्णांनी कोणताही त्रास झाल्यास तत्काळ उपचार सुरू करावेत, असे डॉक्टरांनी सांगितले.
-----
पुण्यात विविध रुग्णालये, डेंटल क्लिनिकमध्ये या आजाराचे सुमारे एक हजार रुग्ण आढळले असून, कोरोनानंतर या बुरशीची माहिती नसल्याने संसर्ग वाढत आहे. वेळीच निदान, उपचार होत नसल्याने दात, वरचा जबडा, डोळे, दृष्टी, यावर परिणाम होऊन काही रुग्णांना प्राण गमवावे लागत आहे. कर्करोगाच्या वाढीपेक्षा हा संसर्ग वाढण्याचा वेग दहापट आहे. सरकारने या संसर्गाची दखल घेऊन एस.ओ.पी. तयार केली पाहिजे. कोरोना रुग्णांना म्युकरमायकोसिस वाचवण्यासाठी दक्ष राहणे आवश्यक असून फिजिशियन, कोरोना उपचार केंद्रे, डेंटल क्लिनिक, ओरल मॅक्सिलोफेशियल सर्जन (मुख शल्य चिकित्सक) नाक - कान- घसा तज्ज्ञ, दंत शल्यचिकित्सक, न्यूरो सर्जन या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. रोगाचे निदान -उपचार -पुनर्वसन या तिन्ही टप्प्यात दंत शल्यचिकित्सक महत्त्वाचे योगदान देऊन रुग्णाचा प्राण वाचवू शकतात.
- डॉ. जे. बी. गार्डे, दंतशल्यचिकित्सक, मॅक्सिलोफेशियल विभागप्रमुख, एम. ए. रंगूनवाला दंत महाविद्यालय