डायल ११२... ५ मिनिटांत मिळणार पोलीस मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:11 AM2021-05-27T04:11:51+5:302021-05-27T04:11:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : नागरिकांना पोलिसांची मदत हवी असेल तर आपण १०० नंबर डायल करतो. आता त्याच्या जोडीला ...

Dial 112 ... you will get police help in 5 minutes | डायल ११२... ५ मिनिटांत मिळणार पोलीस मदत

डायल ११२... ५ मिनिटांत मिळणार पोलीस मदत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : नागरिकांना पोलिसांची मदत हवी असेल तर आपण १०० नंबर डायल करतो. आता त्याच्या जोडीला आणखी एक ११२ या एका हेल्पलाइनवरून सर्व प्रकारची मदत मिळणार आहे. हा नंबर डायल करताच पोलिसांना नेमका फोन कोठून आला, हे समजणार असून पोलीस अवघ्या ५ मिनिटांमध्ये तेथे पोहचणार आहेत. सध्या पोलीस नियंत्रण कक्षाला फोन आल्यानंतर पुणे पोलिसांची सरासरी ७ मिनिटांमध्ये घटनास्थळी मदत पोहोचते. हा वेळ आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ९१ चारचाकी आणि १०१ दुचाकी पोलीस वाहनांवर ही यंत्रणा कार्यन्वित करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पोलीस दल हायटेक करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचा डायल ११२ हा एक भाग आहे.

पुणे शहर पोलीस दलात एकूण ३२ पोलीस ठाणी असून जवळपास ९ हजार पोलीस अधिकारी, अंमलदार कार्यरत आहेत. या पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्काळ मदत हवी असल्यास त्यांना ११२ हा हेल्पलाइन क्रमांक डायल करावा लागणार आहे. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर केंद्रीय पातळीवर एकच हेल्पलाइन असावी, असा निष्कर्ष काढण्यात आला होता. त्यानंतर आपत्कालीन प्रतिसाद साहाय्य प्रणाली (ईआरएसएस) निर्मितीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ही यंत्रणा विकसित करण्यात आली आहे.

कॉल येताच कळणार लोकेशन

११२ या क्रमांकावरून कॉल येताच या यंत्रणेच्या मदतीने व वाहनांवरील जीपीएसच्या साहाय्याने कॉल नेमका कोठून आला, याचे लोकेशन कळण्याची व्यवस्था यात आहे. त्याचवेळी पोलीस नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल, महिला हेल्पलाइन, चाइल्ड हेल्पलाइन यांनाही या कॉलची माहिती दिली जाणार आहे. जेणेकरून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल होऊ शकतील.

९१ चारचाकी, १०१ दुचाकी वाहनांवर यंत्रणा कार्यन्वित

शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व ठिकाणी कमीतकमी वेळेत पोहोचण्यासाठी शहर पोलीस दलातील ९१ चारचाकी आणि १०१ दुचाकी वाहनांवर ही यंत्रणा कार्यन्वित करण्यात आली आहे. या सर्व वाहनांना जिओ टॅगिंग करण्यात आले आहे.

४७५ अधिकारी कर्मचा-यांना विशेष प्रशिक्षण

या यंत्रणेला कसा प्रतिसाद द्यायचा, त्याचा कसा वापर करायचा, याविषयीचे पुणे शहर पोलीस नियंत्रण कक्षातील अधिकारी, कर्मचारी, प्रत्येक पोलीस ठाण्यातील वाहनचालक, मार्शल अशा ४७५ जणांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे प्रशिक्षण १६ डिसेंबरपासून सुरू होते. नुकताच या संपूर्ण यंत्रणेच्या कामकाजाचा आढावा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी घेतला.

ही सर्व यंत्रणा इंटरनेटवर आधारीत असल्याने सर्वत्र चांगले इंटरनेट कव्हरेज मिळणे अपेक्षित आहे़ सध्या या यंत्रणेची चाचणी घेतली जात आहे. त्यातून यात येणा-या अडचणी समजू घेतल्या जात आहे. राज्यातील प्रमुख महानगरांमध्ये सर्वप्रथम डायल ११२ सुरू करण्यात येणार आहे. येत्या जूनपासून ही सुविधा सुरू करण्याचा प्रयत्न आहे.

...

डायल ११२ या हेल्पलाइनसाठी पुणे पोलिसांना ६ नवीन वाहने मिळाली असून त्याशिवाय गस्तीसाठी वापरण्यात येणा-या वाहनांचा वापर होणार आहे. आतापर्यंत पोलीस नियंत्रण कक्षापासून पोलीस चौकीपर्यंतच्या या यंत्रणेशी संबंधित असणा-या अशा ४७५ पोलीस अधिकारी, कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

- स्वप्ना गोरे, पोलीस उपायुक्त, प्रशासन

Web Title: Dial 112 ... you will get police help in 5 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.