नंबर डायल केला अन् खातेच रिकामे झाले! अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल
By भाग्यश्री गिलडा | Published: January 24, 2024 06:39 PM2024-01-24T18:39:19+5:302024-01-24T18:40:03+5:30
फिर्यादीनुसार सिंहगड रोड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे....
पुणे : क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचे सांगत सिंहगड रोड परिसरात राहणाऱ्या एका वृद्धाची फसवणूक केली. याबाबत केशव दगडू बोडके (वय ५२) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सिंहगड रोड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहितीनुसार, फिर्यादींना ७ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अनोळखी क्रमांकावरून फोन आला. क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असून, तुमच्या क्रेडिट कार्डवर विमा पॉलिसी चालू झाली आहे. त्यासाठी २ हजार ९९९ रुपये बिल जनरेट झाले आहे. ते बंद करायचे आहे का? अशी विचारणा केली. फिर्यादींचा विश्वास बसल्याने त्यांनी होकार दिला.
त्यानंतर #४०१* डायल करून पुढे एक मोबाईल नंबर टाकायला सांगितला. असे केल्याने सायबर चोरट्यांना फिर्यादींच्या मोबाईलचा संपूर्ण ॲक्सेस मिळाला. ओटीपीच्या आधारे फिर्यादींच्या बँक खात्यातील २ लाख ९३ हजार ७२७ परस्पर ट्रान्स्फर करून घेतले. अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन करत आहेत.