संवाद - गांधीजींना आठवा आणि आचरणात आणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 02:31 AM2018-10-02T02:31:00+5:302018-10-02T02:31:20+5:30
डॉ. न. म. जोशी : गांधीजींना विसरू नका आणि वापरू नका
साताऱ्यातील पाटण तालुक्यातील ‘गारवडे’ हे माझ गावं. सन चाळीस ते बेचाळीसपूर्वी खेड्यात गांधीजी पोहोचले होते. ‘या गरिबांनो या, झेंडा हाती घ्या, काँग्रेसची हाक, गांधीबाबाची हाक तुम्हा हाय हो’ असे शाळकरी पोरे म्हणायची. १९१५मध्ये गांधीजी भारतात आले. त्या वेळी टिळकयुगाचा अस्त होऊन गांधीयुग अवतरत होते. टिळक विचार बाजूला पडत आपोआप गांधी विचारांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत होता. त्याचा उच्चतम प्रकर्ष म्हणजे गांधीजींची १९४२ ची चळवळ. गांधीजींनी ‘करेंगे या मरेंगे, लेंगे स्वराज्य लेंगे’ अशी घोषणा दिली होती. ‘छोडो भारत आंदोलन’ असा लढा पुकारला होता. ही शहरी भागातली चळवळ नव्हती तर ती खेड्यापर्यंत पोहोचली होती. शेतकरी वर्गाला राजकारणाचा गंध नव्हता, पण तेही दुपारी बांधावर बसून ‘आता खायाची चटणी अन् कांदा, अग कारभारणी सौराज्य मिळवायचे औंदा’ म्हणायचे. गांधीजींनी ‘ग्रामस्वराज्य’ संकल्पना मांडून देशाच्या अर्थकारणाला एक वेगळी दिशा देण्याचे काम केले.
आजच्या अर्थव्यवस्थेमध्ये जे घोटाळे किंवा बेरोजगारीचे प्रश्न दिसतात. या सर्व समस्यांची उत्तरे गांधीजींच्या ‘ग्रामस्वराज्य’ कल्पनेतून दिसून येतात. गांधीजींचा चरखा हा केवळ सूत काढण्यापुरताच मर्यादित नाही, तर ते एका मोठ्या तत्त्वज्ञानाचे प्रतीक आहे. चरखा म्हणजे परिवर्तन आहे. ते फिरवताना जे श्रम पडतात त्याला एक श्रमप्रतिष्ठा आहे. त्यातून जे सूत निघते ते सृजन आहे. याचा अर्थ परिवर्तन, श्रमप्रतिष्ठा आणि सृजन याचे प्रतीक म्हणजे चरखा आहे. आज नवीन तंत्रज्ञानपद्धती आली आणि यंत्रांचा मोठ्या प्रमाणावर वापर आपण करायला लागलो, त्यातून बेकारी वाढली.
गांधीजींच्या या संकल्पनेत प्रत्येक हाताला काम आहे. या माध्यमातून अर्थव्यवस्था किती प्रबल होईल याची माहिती नाही पण स्वावलंबी नक्कीच होईल. स्वराज्याचे मुख्य सूत्र ‘स्वावलंबन’ हेच आहे. जो देश स्वतंत्र असूनही परावलंबी आहे त्यातील जनता स्वातंत्र्य उपभोगू शकत नाही. गांधीजींनी श्रम प्रतिष्ठेमध्ये स्वावलंबन महत्त्वपूर्ण सांगितले आहे. वर्ध्याला गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमात सेवा, निर्मिती, शेती आणि ग्रामस्वराज्य या प्रतीकांचे दर्शन घडते. ग्रामस्वराज्य ही संकल्पना अशापद्धतीने मांडली, की प्रत्येक गाव हे कारभाराच्या दृष्टीने स्वतंत्र युनिट म्हणून काम करेल. खेड्याला उत्पादन त्याच गावातील लोक करतील आणि विक्रीही करतील. ही संकल्पना आजही कालसुसंगत आहे. ती आचरणात आणली तर अनेक प्रश्न सुटतील. सध्याच्या काळात ‘ऊर्जा’ हा जटील विषय आहे. कोयनेची वीज बंद पडली तर सगळा भाग अंधारात अशी स्थिती आहे. आजची जी बायोगॅस यंत्रणा आहे ती देखील गांधीजींनी सेवाग्राममध्ये कार्यान्वित केली होती. उत्सर्जनातून सृजन कसे होते हे त्यांनी प्रत्यक्ष आचरणात आणले.
गांधीजी हे मुस्लिमधार्जिणे होते असे म्हटले जायचे. पण ते समर्थक नव्हते तसे विरोधकही नव्हते. ही माणसच आहेत, त्यांच्यात काही असेल तर हदयपरिवर्तन करावे. यासाठी त्यांनी सत्य आणि अहिंसा हे तत्त्वज्ञान मांडले. दुर्बल घटकांनाही त्यांनी स्वातंत्र्यचळवळीच्या लढ्यात सहभागी होण्याची संधी दिली. त्यामुळे ब्रिटिशांना गांधीजींचे भय वाटत होते. त्यांचा सत्याग्रह हे ब्रिटिशांसमोर उगारलेले शस्त्र होते. त्यांचे तत्त्वज्ञान आजही एकविसाव्या शतकात उपकारक आहे. दुर्दैवाने गांधीजींना आपण केवळ चलनेच्या नोटेवर बसविले आणि अनेक पुतळ्यांच्या माध्यमातून तत्त्वज्ञानाला बंदिस्त केले आहे. ते तत्त्वज्ञान प्रत्यक्ष प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून चलनात आणले तर अनेक प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतील.
‘गांधीजींना विसरू नका आणि वापरू नका. त्यांना आठवा आणि आचरणात आणा’ हे सूत्र मनात बिंबवणे जास्त महत्त्वाचे आहे. अंतरातील देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करणे आणि प्रत्येकाला लढ्यात सहभागी करून घेणे हे असहकार आंदोलनाच्या रूपात गांधीजींनी दाखवून दिले. गांधीजींनी एक शब्द दिला तरी हजारो माणसांनी तुरूंग भरत असे. त्यामुळे गांधीजींना इंग्रज घाबरत असत. गांधीजींचे तत्त्वज्ञान हे आजच्या संगणकीय युगामध्येही उपकारक आहे, असे मत गांधी विचारांचे अभ्यासक डॉ. न. म. जोशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.