Pune: डायलिसीस करायचं? पालिकेच्या आठ सेंटरमध्ये सोय; खर्च फक्त ४०० रुपये

By ज्ञानेश्वर भंडारे | Published: April 2, 2024 03:01 PM2024-04-02T15:01:05+5:302024-04-02T15:06:09+5:30

गेल्या दाेन वर्षांत येथे तब्बल ६९ हजार ४९४ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे....

Dialysis? Facilitation in eight centers of the municipality; Cost is only Rs.400 | Pune: डायलिसीस करायचं? पालिकेच्या आठ सेंटरमध्ये सोय; खर्च फक्त ४०० रुपये

Pune: डायलिसीस करायचं? पालिकेच्या आठ सेंटरमध्ये सोय; खर्च फक्त ४०० रुपये

पुणे : महापालिका व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून खासगी भागीदारी तत्त्वावर (पीपीपी माॅडेल) ना नफा ना तोटा तत्त्वावर आठ ठिकाणी डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आले आहेत. या सेंटरवर अवघ्या ४०० रुपयांत डायलिसिस हाेत असून, गेल्या दाेन वर्षांत येथे तब्बल ६९ हजार ४९४ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

महापालिकेच्या वतीने शहरात आठ ठिकाणी डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आली आहेत. यापैकी दोन सेंटरमधील मशीन महापालिकेच्या मालकीची आहेत. उर्वरित सहा सेंटर खासगी संस्थांना चालवण्यास देण्यात आली आहेत. सर्व डायलिसिस सेंटरमधील एकूण ५७ मशीन आहेत. त्यापैकी सर्वात जास्त व एकूण सेंटरच्या तुलनेत सुमारे ५० टक्के डायलिसिस कमला नेहरू रुग्णालयातील सेंटरवर झाले आहेत.

बदललेली जीवनशैली, खाण्याच्या बदललेल्या सवयी, मधुमेहाचे वाढते प्रमाण आदी कारणांमुळे किडनी विकार वाढले आहेत. त्यामुळेच किडनी निकामी हाेण्याचेही प्रमाण वाढत आहे. भारतामध्ये साधारणपणे दरवर्षी एक लाख रुग्णांना किडनीचे आजार उद्भवत असल्याचे दिसून येत आहे. अशावेळी या रुग्णांना नियमितपणे डायलिसिस सेवा मिळावी, यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे पुढाकार घेण्यात आला आहे.

किडनी निकामी झालेल्या रुग्णांना आठवड्यातून किमान तीनवेळा डायलिसिसची आवश्यकता भासते. यासाठी खासगी रुग्णालयात सुमारे दोन ते तीन हजार रुपये खर्च येतो. परंतु, महापालिकेच्या डायलिसिस सेंटरमध्ये रुग्णांना ४00 रुपये दराने डायलिसिसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी दिली.

सेंटरचे नाव व पत्ता - मशीन संख्या - डायलिसिस झालेले रुग्ण

कमला नेहरू रुग्णालय - १२ - ३८९१७

राजीव गांधी रुग्णालय येरवडा - १० - १७७१८

कै. चंदूमामा सोनवणे हॉस्पिटल, भवानी पेठ - ४ - ३१८५

कै, शिवरकर दवाखाना, वानवडी - १० - ४६१५

कै. अरविंद गणपत बारटक्के दवाखाना, वारजे - ४ - १८१०

कै. रखमाबाई थोरवे दवाखाना, आंबेगाव - ७ - ५०३

कै. मीनाताई ठाकरे प्रसूतिगृह, कोंढवा - १० - ५५२४

कै. द्रौपदाबाई खेडेकर दवाखाना, बोपोडी - १० - १८७

.............

एकुण - ६९ हजार ४९४

महापालिकेच्या वतीने पीपीपी तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या डायलिसिस सेंटरमध्ये गरीब व गरजू रुग्णांना डायलिसिससारखे महागडे उपचार अत्यल्प दरामध्ये उपलब्ध हाेतात. या प्रकल्पांतर्गत २०२२ ते मार्च २०२४ पर्यंत ६९ हजार ४९४ रुग्णांनी डायलिसिसचा लाभ घेतला आहे.

- डॉ. भगवान पवार, आरोग्य प्रमुख, महानगरपालिका

 

Web Title: Dialysis? Facilitation in eight centers of the municipality; Cost is only Rs.400

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.