Hepatitis, HIV रुग्णांना डायलिसिस अत्यंत मुबलक दरात; महापालिकेच्या दवाखान्यात सुविधा
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: May 30, 2023 04:44 PM2023-05-30T16:44:19+5:302023-05-30T16:45:43+5:30
खासगी सेंटरमध्ये एका वेळच्या डायलिसिसाठी 2 ते ५ हजार रुपयांपर्यंत खर्च तर, महापालिकेच्या सेंटरमध्ये 378 ते 400 रुपये
पुणे : किडनी निकामी झालेल्या रुग्णांना रक्त शुध्द करून घेण्यासाठी डायलिसिस करावे लागते. परंतू, असेही काही रुग्ण असतात ज्यांना हिपॅटायटिस, एचआयव्ही रुग्ण असतात. अशा रुग्णांसाठी महापालिकेच्या बोपोडीमधील खेडकर दवाखान्यात ‘पीपीपी माॅडेल’ नुसार नवीन डायलिसिस सेंटर सुरु करण्यात आले आहे. येथे डायलिसिसच्या 10 खाटा असून पुढील आठवड्यापासून हिपॅटायटिस, एचआयव्ही रुग्णांना येथे डायलिसिस करता येणार आहे.
सध्या शहरात महापालिकेची ‘पीपीपी’ तत्वावर 11 डायलिसिस सेंटर आहेत. यापैकी काही सेंटरमध्ये 4 तर काही सेंटरमध्ये 10 मशीन आहेत. सरकारी दवाखान्यांत ही सुविधा देण्यात येते. या डायलिसिस सेंटरसाठी लागणारी जागा महापालिकेकडून उपलब्ध करुन देण्यात येते. असे सेंटर आहेत.
महापालिकेच्या एकाही सेंटरमध्ये आतापर्यंत हिपॅटायटिस बी, सी तसेच एचआयव्ही रुग्णांसाठी डायलिसिस मशीनची सेवा उपलब्ध नव्हती. आता ती बाेपाेडी येथे उपलब्ध केली आहे. याआधी कात्रज येथील महापालिकेच्या दवाखान्यांत डायलिसिस मशीन उपलब्ध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले होते. मात्र, तेथे अद्याप सुविधा सुरु झालेली नाही. त्यामुळे रुग्णांसाठी स्वतंत्र डायलिसिस मशीन उपलब्ध करुन देणारे बोपोडीतील खेडकर दवाखाना येथील सेंटर पुण्यातील पहिले सेंटर असल्याची माहिती सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी दिली.
पुणे शहरात सध्या अंदाजे दाेन हजार नागरिक डायलिसिसवर असतील. खासगी सेंटरमध्ये एका वेळच्या डायलिसिसाठी 2 ते ५ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. तर, महापालिकेच्या सेंटरमध्ये एका डायलिसिसाठी 378 ते 400 रुपये इतका खर्च येतो. शहरी गरीब योजनेअंतर्गत असलेल्या रुग्णांना 189 रुपये शुल्क भरावे लागते. एका मशीनवर एक डायलिसिस करण्यासाठी चार ते पाच तास लागतात. एका मशीनवर दिवसभरात केवळ दोन-तीन डायलिसिस होतात.