सोनेबाजाराला हिऱ्याची चमक, रात्री उशिरापर्यंत बाजारात गर्दीचा उत्साह
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 03:00 AM2018-11-06T03:00:25+5:302018-11-06T03:00:45+5:30
नत्रयोदशीचा मुहूर्त साधत नागरिकांनी सोन्याबरोबरच हिºयाच्या दागिन्यांची जोरदार खरेदी केली.
पुणे - धनत्रयोदशीचा मुहूर्त साधत नागरिकांनी सोन्याबरोबरच हिºयाच्या दागिन्यांची जोरदार खरेदी केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रतितोळा अडीच ते तीन हजार रुपयांची वाढ होऊनही सराफ बाजारात सोमवारी (दि. ५) रात्री उशिरापर्यंत गर्दी होती. सोन्याबरोबरच हिºयांच्या दागिन्यांच्या मागणीतही मोठी वाढ झाल्याचे निरीक्षण सराफ व्यावसायिकांनी नोंदविले. त्यामुळे सोनेरी बाजाराला हिºयांची चमक प्राप्त झाल्याचे चित्र दिसून येत होते.
शहरातील सराफ बाजार सोमवारी बंद असतो. मात्र, मुहूर्तावर सोनेखरेदी करण्याची प्रथा लक्षात घेऊन लक्ष्मी रस्त्यासह शहरातील सराफ बाजार सुरू ठेवण्यात आला होता. सकाळी सात वाजता सुरू झालेली बाजारातील वर्दळ रात्री उशिरापर्यंत होती. सोमवारी चोख सोन्याचा भाव (२४ कॅरेट) ३२ हजार ५०० ते ३२ हजार ६०० इतका होता. तर, चांदीचा प्रतिकिलो दर ३९ हजार ३०० रुपयांदरम्यान होता. पूजेसाठी चांदीची लक्ष्मी आणि कुबेराच्या मूर्तीला चांगली मागणी होती. तसेच चांदीची लक्ष्मी प्रतिमा असलेले नाणे खरेदीसाठी नागरिक पसंती देत होते. अगदी ५० ग्रॅमपासून १० किलोपर्यंतच्या लक्ष्मी आणि कुबेरमूर्ती खरेदीसाठी उपलब्ध होत्या.
याशिवाय सोन्याचे दागिने, मंगळसूत्र, टेम्पल आणि भरजरी दागिन्यांना चांगली मागणी आहे. सोन्याबरोबरच हिºयांचे दागिने खरेदी करण्याकडे खरेदीदारांचा कल वाढत आहे. कमी वजनाच्या हिºयाच्या वस्तूंना अधिक पसंती होती. त्यात १५ हजार रुपये किमतीच्या अंगठीपासून एक लाख रुपयांपर्यंतचे दागिने, बांगड्या, कानातील डूल याला मागणी आहे. याशिवाय मंगळसूत्राच्या वाट्यादेखील हिºयाच्या घेण्याकडे खरेदीदारांचा कल दिसून येत असल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले. गेल्या दिवाळीमध्ये सोन्याचा प्रतितोळा भाव २९ हजार ६०० रुपये होता. त्यात अडीच ते तीन हजार रुपयांदरम्यान वाढ झाली आहे, असे असूनही सोनेखरेदीत वाढ झाली आहे. यंदा अपेक्षेपेक्षा सोनेखरेदीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले.