'देशात हुकूमशाही पुन्हा डोकावतेय'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 01:27 AM2019-04-03T01:27:15+5:302019-04-03T01:28:06+5:30

किरण नगरकर : नयनतारा सहगल यांना भाई वैद्य स्मृती गौरव पुरस्कार

Dictating dictatorship again, says nagarkar in pune speech | 'देशात हुकूमशाही पुन्हा डोकावतेय'

'देशात हुकूमशाही पुन्हा डोकावतेय'

Next

पुणे : माणसाकडे विचार करण्याची क्षमता आहे. कोणतीही कृती करण्याआधी, निर्णय घेण्याआधी त्याला परिणामांचा विचार करता येतो. परंतु, सध्या भारतीय लोकांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का, असा सवाल ज्येष्ठ लेखक किरण नगरकर यांनी उपस्थित केला. हिटलर गेल्यानंतर तसा माणूस पुन्हा होणार नाही, असे वाटले होते. मात्र, हुकूमशाही अनेक देशांमध्ये पुन्हा डोकावू लागली आहे, हिटलर परत आलाय, अशा शब्दांत त्यांनी परखड टीका केली.

आरोग्य सेना आणि भाई वैद्य फाउंडेशनतर्फे भाई वैद्य यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त लोकनेते भाई वैद्य स्मृती गौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्यावतीने नगरकर यांनी पुरस्कार स्वीकारला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू न शकल्यामुळे सहगल यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी कष्टकऱ्यांचे नेते बाबा आढाव, आरोग्य सेना आणि भाई वैद्य फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अभिजित वैद्य, पन्नालाल सुराणा, डॉ. प्राची रावळ, लक्ष्मीकांत देशमुख, जयंत मटकर, प्रा. विलास वाघ, डॉ. नितीन केतकर, प्रा. गीतांजली वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. अभिजित वैद्य यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. डॉ. नीलिमा वैद्य यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. नितीन केतकर यांनी प्रास्ताविक केले.

अल्पसंख्याक दहशतीखाली
४व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना सहगल म्हणाल्या, ‘अल्पसंख्याक दहशतीखाली आहेत हे कशाचे लक्षण आहे? तुमच्या श्रद्धांबाबत कोणी प्रश्न उपस्थित केला, की लगेच आपल्या विरोधातला आहे, असे समजून एक तर त्याला ऐनकेन प्रकारे तुमच्या विचारधारेशी जुळवून घेण्यास भाग पाडले जाते.
४अन्यथा त्यांचा दाभोलकर, कुलबुर्गी, गौरी लंकेश केला जातो. आमच्यासोबत या, अन्यथा परिणामांना सामोरे जा, असे वातावरण अनुभवावयास मिळत आहे. अशाने घटनेची पायमल्ली होत आहे. अभिव्यक्तीस्वातंत्र्याची तर पदोपदी पायमल्ली होत आहे. शाळा, महाविद्यालय स्तरांपासून बुद्धीभ्रम करण्याचे षड्यंत्र सुरू आहे. कला-साहित्य-संगीत सर्वच कला सरकारच्या रडारवर आल्या आहेत.

नगरकर म्हणाले, ‘सत्ताधाऱ्यांना सरदार पटेल यांच्याबद्दल काय माहीत आहे? एवढे पैसे खर्च करून पुतळा उभारण्याऐवजी २५ दवाखाने उभारता आले असते. कोणाचा आदर कसा करावा, हे कळत नाही का? इतिहासातील त्यांना जी हवी आणि जशी हवी तीच व्यक्तिमत्त्वे पुढे येत आहेत. मोठमोठे पुतळे उभारून भारत घडणार नाही, तर प्रत्यक्ष कामगिरीची गरज आहे.’
४बाबा आढाव म्हणाले, ‘काल दुपारी मोदींचे भाषण ऐकल्यावर खूप अस्वस्थ वाटले, तेव्हा भाईची खूप आठवण आली. या देशांमध्ये हजारो वर्षात हिंदू दहशतवादाचे एकही उदाहरण नाही, असे म्हणत त्यांनी नथुरामाचे नाव न घेता श्रद्धांजली वाहिली. सध्या लोकशाहीचा नंगानाच चालू आहे. निवडणुकीत धर्माचा, जातीचा वापर केला जात आहे. सरकारविरोधात बोलले, की तो देशद्रोह ठरवून निर्दोष लोक तुरुंगात धाडले जातात आणि खरे गुन्हेगार रस्त्यावर मोकाट फिरतात.’

Web Title: Dictating dictatorship again, says nagarkar in pune speech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.