महापालिकेत हुकूमशाही कारभार
By Admin | Published: July 7, 2017 03:38 AM2017-07-07T03:38:07+5:302017-07-07T03:38:07+5:30
‘राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे खोटेनाटे आरोप करून भाजपाने पिंपरी महापालिकेत सत्ता काबीज केली. मात्र, अवघ्या चार महिन्यांतच
पिंपरी : ‘राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे खोटेनाटे आरोप करून भाजपाने पिंपरी महापालिकेत सत्ता काबीज केली. मात्र, अवघ्या चार महिन्यांतच भाजपाच्या भ्रष्टाचाराची तक्रार पंतप्रधान कार्यालयाकडे केली. महापालिका सभागृह कसे चालवावे हे देखील न कळणारे भाजपावासीय सत्तेमुळे भांबावून गेले आहेत. विरोधी पक्षनेत्याला दालनही न मिळवून देणाऱ्या भाजपाचा कारभार हुकूमशाही पद्धतीने सुरू आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात महापालिका निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्या वेळी ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते - पाटील, युवती प्रदेशाध्यक्षा स्मिता पाटील, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, माजी महापौर मंगला कदम, अपर्णा डोके, डॉ. वैशाली घोडेकर, शकुंतला धराडे, अनिता फरांदे, भाऊसाहेब भोईर, नाना काटे, दत्ता साने आदी उपस्थित होते.
पराभवानंतर पवार कार्यकर्त्यांशी संवाद साधणार त्यामुळे उत्सुकता होती. पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याबरोबरच पक्ष संघटनेसाठी काम करा, असे आवाहन केले. शहरात कामे करूनही पराभव झाल्याने वाईट वाटले. या पराभवाची जबाबदारी माझीच आहे. विरोधकांच्या आरोपांना भुलून मतदारांनी मतदान केले. आता चार महिन्यांतच भ्रमनिरास झाल्याचे मतदार म्हणत आहेत.’’
साधा पीएमपीएमएलचा अधिकारीदेखील यांचे ऐकत नाही. पालकमंत्र्यांचे शहराकडे लक्ष नाही. पीएमआरडीएचे कार्यालय पुण्यात नेले. शहर विकास नव्हे तर भकास करण्याच्या दृष्टीने भाजपाची पाऊले पडत आहेत. राष्ट्रवादी नगरसेवकांनी भाजपाच्या चुकीच्या कामांना प्रखरपणे विरोध करावा. बिल्डर धार्जिण्या निर्णयाविरोधात वाचा फोडावी, असेही पवार म्हणाले.
महापालिकेतील सत्ता गमावली तरी अजूनही आम्ही सत्ताधीश असल्याचा तोऱ्यात आहोत. अजित पवार आल्यावरच आम्ही व्यासपीठावर एकत्र येतो. भूतकाळात काही चुका झाल्या असतील तर त्याची उजळणी करण्याची वेळ नाही. आजही काहींना आपलीच सत्ता असल्यासारखे वाटते. केवळ नेते आल्यावरच एकत्र येतात. मात्र, गटबाजी, नाराजी रोखण्यासाठी नेत्यांनी आसूड उगारावाच, पक्ष संघटनेसाठी कटू निर्णय घ्यावेत, असे आवाहन माजी आमदार विलास लांडे यांनी केले.
संजोग वाघेरे म्हणाले, भाजपाने ना भय ना भ्रष्टाचाराचा नारा दिला होता. परंतु, चार महिन्यांतच त्यांचे खरे रूप दिसून येत आहे. भाजपा पदाधिकाऱ्यांचे डोळे फिरले आहेत.’’ विरोधी पक्षनेते योगेश बहल म्हणाले, ‘‘महापालिका निवडणुकीतील प्रभागरचनेपासून पोलिसांपर्यंत सर्वच यंत्रणा ताब्यात ठेवल्या. मात्र, अवघ्या चार महिन्यांत भ्रमाचा भोपळा फुटला आहे. भाजपाकडे कोणताही ठोस कार्यक्रम नाही. सध्याची अवस्था वाईट आणि विचित्र आहे.’’ भाऊसाहेब भोईर म्हणाले, ‘‘निवडणुकीत बराच खर्च केल्यामुळे वसुली भाजपा नेत्यांना करायची आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराची घाई झाली आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीत आम्ही सोडणार नाही. त्यांच्या आर्थिक नाड्या आवळू.’’
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सुनील तटकरे म्हणाले, पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात आपल्याला अपयश का आले याचे आत्मपरीक्षण करणे गरेजेचे आहे. विकासकामे करूनही पराभव झाल्याची खंत मनात आहे. परंतु, यापुढे सर्वांनी एकदिलाने काम करावे. एका पराभवामुळे खचून न जाता जोमाने
काम करावे, पक्षसंघटन मजबूत करावे.’’
आमदारांचे चुलत बंधू
राजेंद्र जगताप राष्ट्रवादीत
पिंपरी : उमेदवारी देऊन अपक्ष उमेदवाराला निवडून आणल्याचा आरोप करीत माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी भाजपाला रामराम केला. भाजपााचे शहराध्यक्ष आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे ते चुलतबंधू आहेत.अजित पवार यांच्या उपस्थितीत आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला. राजेंद्र जगताप हे नुकत्याच झालेल्या पालिकेच्या निवडणुकीत नवनाथ जगताप यांच्या विरोधात त्यांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता.