रस्त्याच्या दुतर्फा लावलेली झाडे चोरीला गेली की काय ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 02:59 AM2019-03-13T02:59:33+5:302019-03-13T02:59:54+5:30
पुणे-सोलापूर महामार्गाचे चौपदरीकरण; जुन्या वृक्षांची बेसुमार कत्तल, रस्ते झाले भकास
लोणी काळभोर : पुणे - सोलापूरमहामार्गाचे चौपदरीकरण करताना जुन्या वृक्षांची बेसुमार कत्तल करण्यात आली. त्या वेळी नवीन १४ हजार झाडे लावण्यात येणार, असे सार्वजनिक बांधकाम विभाग व आर्यन टोल रोड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून जाहीर करण्यात आले होते. आता ३९५० झाडे लावल्याचा दावा करण्यात येत आहे. परंतु, गेल्या १५ वर्षांपासून रस्त्याच्या दुतर्फा झाडी दिसत नसल्याने रस्ता भकास दिसत आहे. त्यामुळे लावलेली झाडे चोरीला गेली की काय, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
आय. आर. बी. कंपनीला कवडीपाट ते यवत या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम मिळाले. या २७ किलोमीटरच्या कामासाठी त्या वेळी ८८ कोटी रुपयांचे बजेट तयार करण्यात आले होते. प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानंतर, जुन्या महामार्गावर असलेली वड, चिंच, लिंब अशी सुमारे १०० वर्षांपूर्वीची तब्बल १ हजार ८०० अस्सल भारतीय झाडांवर कुºहाड चालवून ती जमीनदोस्त करण्यात आली. त्या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन अभियंता शामकांत पाटील यांनी या २७ किलोमीटर अंतरात १४ हजार झाडे लावण्यात येणार, असे जाहीर केले होते. आज वृक्षारोपण केल्याचा दावाही करण्यात येत आहे. परंतु, लोणी काळभोर ते यवत दरम्यान शेतकऱ्यांनी बांधावर लावलेली झाडे वगळता महामार्गालगत काही ठिकाणचा अपवाद वगळता झाडेच दिसून येत नसल्याने १५ वर्षांपूर्वी खरीच झाडे लावण्यात आली होती का, अशी शंका उत्पन्न होत आहे.
रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर, सन २००४ पासून टोलवसुलीचे काम सुरू झाले आहे. १५ वर्षे टोलवसुली करण्याची परवानगी शासनाने दिली होती. त्यानुुुसार सदर टोल वसुली १० मार्च २०१८ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत करण्यात आली. यांत कंपनीने नोटाबंदीच्या काळात २२ दिवस टोलनाका बंद असल्याने तोटा झाला असल्याचे दाखवले व तो भरून काढण्यासाठी मुदतवाढही मागितली होती. परंतु ,महाराष्ट्र शासनास दया न आल्याने कंपनीला मुदत वाढ मिळाली नाही. कवडीपाट (ता. हवेली) येथे व कासुर्डी (ता. दौंड) या दोन्ही टोलनाक्यावर वसुली सुरू होती. परंतु ज्या गांभीर्याने टोलवसुली करण्यात आली, त्या प्रमाणात प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये मात्र अभाव असल्याचे जाणवले. वृक्षतोड, वाढत्या नागरीकीकरणांमुळे वाहनांचे वाढते प्रमाण, पाणी, कोळसा आदी नैसर्गिक साधनसंपत्ती व विजेचा मोठ्या प्रमाणात अनियंत्रित वापर इत्यादी कारणांमुळे पर्यावरणाचा मोठा ºहास होत आहे.
कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग पुणे - महामार्ग चौपदरीकरणाच्या वेळी तोडण्यात आलेल्या वृक्षांचे पुनर्रोपन करण्यात आले नाही. परंतु, २००४ मध्ये वृक्षारोपण करण्यात आले. त्यापैकी सध्या लिंब, गुलमोहर, उंबर, सुबाभूळ, बोर, पिंपळ, चिंच, शेवगा, जांभूळ, निवडूंग, आपटा, करंज आदी जातीची ३९५० झाडे जिवंत आहेत.
- सी. बी. चौरे
विश्वस्त श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्री क्षेत्र देहू, पालखी सोहळा प्रमुख - महामार्गाचे चौपदरीकरण होण्यापूर्वी हडपसर ते यवत दरम्यान असलेल्या घनदाट वृक्षराजीमुळे सावलीतूनच प्रवास होत असल्याने उन्हाचा त्रास जाणवत नव्हता, त्यामुळे वारकरी सावलीमध्ये विसावा घेत पंढरपूरकडे मार्गक्रमण करत होते. वृक्षतोड करण्यात आल्यानंतर पुन्हा वृक्षारोपण केले नसल्याने आता मात्र वारकऱ्यांना सावलीचा शोध घ्यावा लागतो. शासन वृक्षारोपणाच्या बाबतीत उदासीन असेल, तर देहू संस्थान पालखी सोहळ्यात सहभागी लाखो वारकरी व स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहाय्याने वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करणार आहे.
- हभप सुनील दिगंबर मोरे