आमच्या कुटुंबाचे चुकलं का? पिंपरीत 'फ्लेक्सबाजी'तून भाजप नगरसेवकाचं बंडाचं निशाण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 03:13 PM2021-03-20T15:13:01+5:302021-03-20T15:25:20+5:30
पिंपरीत भाजपला गटबाजीचा धोका : पक्षश्रेष्ठी व स्थानिक नेत्यांवर उघड नाराजी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात माझे वडील बाबासाहेब लांडगे व माझे चुलते अंकुशराव लांडगे यांनी भाजपाचा पाया रोवून पक्षाचा विस्तार केला. आमचे कुटुंब ४० वर्षांपासून भाजपशी एकनिष्ठ राहिले. तरीही महापालिकेतील महत्त्वाच्या पदासाठी निष्ठावंताचा विचार केला गेला नाही. त्यामुळे माझे व आमच्या कुटुंबाचे चुकलं का ? असा भावनिक सवाल करीत भाजपचे नगरसेवक रवी लांडगे यांनी बंडाचे निशाण उभारले आहे.
महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत शहरातून बिनविरोध निवडून आलेले एकमेव नगरसेवक म्हणून रवी लांडगे यांचे नाव घेतले जाते. महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर गेल्या चार वर्षांत त्यांना एकही महत्त्वाचे पद मिळाले नव्हते. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्षपदासाठी निष्ठावंत गटातून त्यांना दावेदार समजले जात होते. मात्र, एक महिन्यांपुर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याचे निमित्त करून त्यांचा पत्ता कट करण्यात आला. त्यामुळे रवी लांडगे यांनी स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर नाराज झालेल्या लांडगे यांचे नाव उपमहापौरपदासाठी पुढे करण्यात आले. मात्र, त्याविषयी त्यांनी अनुकूलता दर्शविली नाही. त्यामुळे ते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
आमच्या कुटुंबाने ४० वर्षे भाजपशी एकनिष्ठता जपली, सोयीचे नाही तर स्वाभिमानाने राजकारण केले, आमचं चुकलं का ? गोरगरिबांसाठी बांधलेल्या रुग्णालयाच्या खासगीकरणाला विरोध केला, मीही पक्षाशी एकनिष्ठ राहिलो, हे माझे चुकलं का ? असे स्थानिकांच्या भावनेला हात घालणारी फ्लेक्सबाजी भोसरी विधानसभा मतदारसंघात रवी लांडगे यांच्या समर्थकांनी केली आहे. भाजपचे शहराध्यक्ष व भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना उघडपणे या फ्लेक्सबाजीतून आव्हान दिल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.
---------------
म्हणून नितीन लांडगेंना संधी...
महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून भोसरीचे आमदार महेश लांडगे व चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हातात महत्त्वाच्या पद वाटपाचे सूत्रे पक्षश्रेष्ठींनी दिली आहेत. महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्षपद म्हणजे भविष्यात आमदारकीचे दावेदार समजले जाते. त्यापार्श्वभूमीवर यंदा स्थायी समिती अध्यक्षपदावर भोसरीतून रवी लांडगे व चिंचवडमधून शत्रुघ्न काटे यांनी दावा केला होती. परंतु, दोन्ही नेत्यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघात भविष्यात वरचढ ठरेल, अशा नगरसेवकाला संधी देण्याचा धोका पत्करला नाही. म्हणून स्थायी समिती अध्यक्षपदाची माळ नितीन लांडगे यांच्या गळ्यात पडल्याची भाजपच्या गोटात चर्चा आहे.