पुण्यातल्या या ठिकाणी मिळणारी हिरव्या सॅम्पलची मिसळ तुम्ही खाल्लीत का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 06:49 PM2018-06-06T18:49:54+5:302018-06-06T18:49:54+5:30
पुण्यातील बुधवार पेठेतील 108 वर्ष जुन्या वैद्य उपहारगृहात मिळते अागळी-वेगळी हिरव्या सॅम्पलची मिसळ.
पुणे : पुणे अाणि मिसळ यांचं एक वेगळंच नातं अाहे. पुण्याच्या विविध भागात मिळणाऱ्या मिसळची ख्याती जगभर अाहे. चिवडा, उसळ अाणि त्यात टाकलेला कांदा अाणि साेबत असलेलं लाल रंगाचं सॅम्पल अशी खरीतर मिसळची अाेळख परंतु पुण्यातील बुधवार पेठेतील 108 वर्ष जुन्या वैद्य उपहारगृह येथील मिसळची खासीयतच वेगळी अाहे. येथे तुम्हाला मिसळ साेबत मिळते चक्क हिरव्या रंगाचे सॅम्पल.
रघुनाथ वैद्य यांनी वैद्य उपहारगृहाची सुरुवात केली हाेती. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक स्वातंत्र्य सैनिक या उपहारगृहात मिसळ खाण्यासाठी येत असत. त्याचबराेबर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हेही या ठिाकणी येत हाेते. शहराच्या मध्यभागी हे उपहारगृह असल्याने अनेक कलाकारांची सुद्धा येथे राेज हजेरी असायची. इतर ठिकणी मिळणाऱ्या मिसळपेक्षा या ठिकाणची मिसळ वेगळी असल्याने येथे माेठी गर्दी असते. खासकरुन सकाळच्यावेळी अनेक लाेक येथील मिसळचा अास्वाद घेतात. या ठिकाणच्या मिसळमध्ये बटाटा, पाेहे, उसळ अाणि शेव टाकली जाते. त्या जाेडीला हिरव्या चटणीचे सॅम्पल असते. त्यामुळे या मिसळची चव वेगळी लागते. मिसळवर घातली जाणारी शेव ही याच ठिकाणी तयार केली जाते. तिच्या चवीच्या माेहापायी अनेकजण या ठिकाणी फक्त शेव खाण्यासाठीच येत असतात.
या उपहारगृहाचं अाणखी एक वैशिष्ट म्हणजे येथील एेतिहासिक बाज. जुन्या पद्धतीचं फर्निचर अजूनही या ठिकाणी तसेच ठेवण्यात अाले अाहे. त्यामुळे इथे मिसळ खाताना अापण स्वातंत्र्यपूर्व काळात हरवून जाताे. पुण्याच्या नियमाप्रमाणे दुपारच्यावेळी हे उपहारगृह बंद असते. या मिसळ बराेबरच येथे मिळणारी भजी सुद्धा खवय्यांच्या अावडीचा पदार्थ अाहे. गेल्या 108 वर्षांपासून पुणेकर येथील मिसळचा अास्वाद घेत अाहेत. हे उपहारगृह म्हणजे अाता एक परंपरा झाले अाहे.